हत्येनंतर ९०० ग्रॅम सोने गेले चोरीला
By Admin | Updated: January 1, 2017 20:17 IST2017-01-01T20:17:03+5:302017-01-01T20:17:03+5:30
सराफा व्यापारी खून प्रकरणात आता नवीन खळबळजनक घटना पुढे आली.

हत्येनंतर ९०० ग्रॅम सोने गेले चोरीला
ऑनलाइन लोकमत
आखाडा बाळापूर, दि. 1 - येथील सराफा व्यापारी खून प्रकरणात आता नवीन खळबळजनक घटना पुढे आली. मृत व्यापाऱ्याचा मेहुणा व आखाडा बाळापूर येथील सराफा असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तपास अधिकाऱ्यांची भेट घेत तब्बल ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यामुळे या खून प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.
येथील सराफा व्यापारी भोजलिंग प्रताप पाटील यांचा एरिगेशन कॅम्पच्या माळरानावर खून झाला. या खूनप्रकरणी दोघांना अटक केली असून, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले असताना आठ ते नऊ दिवसांनंतर मयत भोजलिंगचे मेहुणे युवराज परशुराम जाधव व सराफा असोसिएशनचे शिष्टमंडळ दुपारी २ वाजता ठाण्यात येऊन तपासिक अमलदार सापोनि जी. एस. राहिरे यांची भेट घेतली. मेहुणा भोजलिंग याची हत्या झाली. त्या दिवशी दुकानावरून घरी आणून ठेवलेल्या बॅगेत सोन्याचे दागिने असलेला डब्बा चोरीला गेला. त्यात ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती दिली. एवढे मोठे दागिने चोरी झाल्याची माहिती उशिराने सांगितल्याबद्दल पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले. तुमची काय माहिती असेल ती द्या परंतु पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, खरा आरोपी शोधून काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिष्टमंडळात युवराज जाधव, सुरेश जाधव, मधुकर लोलगे, प्रविण वर्मा, अमोल टाक, बालाजी शहाणे, भैरु वर्मा, ओंकार अमाने, संजय वर्मा, संग्राम पाटील, राजू बहिवाळ, संजय जाधव आदींचा समावेश होता. सोने चोरी झाली काय? अशी वारंवार पोलिसांनी विचारणा केली होती. परंतु चोरीबाबत नकार दिला गेला. पण नऊ दिवसानंतर लखो रुपयाचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. यामुळे तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर दोन्हीही अरोपीची घरझडती घेण्यात आली व इतर लोकांची इनकॅमेरा चौकशी सुरू केली.
तपासाबाबत मार्गदर्शन
पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास अधिकारी सपोनि राहिरे यांना तपासाबाबत सूक्ष्म टिप्स दिल्या. तसेच बारकाईने तपास करून सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिले. सराफा असोसिएशनच्या भेटीनंतर तपास अधिकाऱ्यावर दडपण येऊ नये यासाठी मोराळे यांनी भेट दिलल्याची चर्चा आहे.
तपासाची दिशा भरकटणार नाही- राहिरे
सराफा व्यापारी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लगेचच आरोपी बंडू गव्हाणे याला घेऊन त्याचे पिंगळी येथील घर व हदगाव येथील खोलीची झडती घेण्यात आली. पण मृताचा मोबाईल अथवा सोने काहीच आढळून आले नाही. तरीही तपासाची दिशा भरकटणार नसल्याचे राहिरे यांनी सांगितले.