गडकरींच्या कृपेने राज्याला ९०० कोटी
By Admin | Updated: February 23, 2015 02:33 IST2015-02-23T02:33:33+5:302015-02-23T02:33:33+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कृपेमुळे महाराष्ट्रातील हायवे आणि पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीकरिता प्रथमच ९०० कोटी रुपये एवढी

गडकरींच्या कृपेने राज्याला ९०० कोटी
मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कृपेमुळे महाराष्ट्रातील हायवे आणि पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीकरिता प्रथमच ९०० कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मंजूर झाली आहे. आतापर्यंत ‘सेंट्रल रोड फंड’ म्हणून महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी कधी मिळाला नव्हता. ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही घोषणा वास्तवात उतरणे कठीणच असल्याने लोकांच्या रोषाची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
राज्यातील पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर प्रति लीटर एक रुपया असा सेस आकारून केंद्र सरकार ‘सेंट्रल रोड फंड’ उभारते. यातील निम्मी रक्कम ही केंद्र सरकारच्या तर निम्मी रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केली जाते. या रकमेतून राज्यातील हायवे व पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. ज्या राज्यात पेट्रोल, डिझेलचा जेवढा खप त्यानुसार सेंट्रल रोड फंड देण्याचे सूत्र आहे. मात्र भूपृष्ठ वाहतूक हे खाते गडकरी यांच्याकडे असल्याने त्यांनी यंदा ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्य महामार्गांची स्थिती व त्यावर आकारला जाणारा टोल यावरून टीका होत असताना आणि टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा प्रत्यक्षात येणे अशक्य असताना अतिरिक्त निधीमुळे मुख्य रस्त्यांची स्थिती सुधारून टोलवरून होणाऱ्या टीकेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)