इजिप्तवरून ८४ टन कांदा मुंबईत
By Admin | Updated: August 22, 2015 01:16 IST2015-08-22T01:16:36+5:302015-08-22T01:16:36+5:30
कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी

इजिप्तवरून ८४ टन कांदा मुंबईत
नामदेव मोरे, नवी मुंबई
कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आयात होणार असून त्यामुळे भाव काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यासह पुर्ण देशामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वाधीक कांदा उत्पादन होणाऱ्या नाशीकमधील होलसेल मार्केटमध्येही कांदा ५० ते ६० रूपये किलो दराने विकला जात आहे. मुंबईमध्येही कांद्याचे दर गगनाला भिडले असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० ते ८० रूपये किलो दराने विकला जात आहे. एलीगंड्स फुड्स या कंपनीने इजिप्तचा कांदा दुबईवरून समुद्राच्या मार्गे मागविला होता. गुरूवारी रात्री ३ कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटी बंदरामध्ये दाखल झाला आहे. श्री स्वामी समर्थ शिपींग कंपनीने सोपस्कर पुर्ण करून शुक्रवारी रात्री कांदा जेएनपीटी बंदराबाहेर काढला आहे. कंपनीचे मालक सचीन धुमाळ यांनी सांगितले की शनिवारी इजिप्तचा कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इजिप्तवरून ३० ते ४० कंटेनरमधून अजून १ हजार टन पेक्षा जास्त कांदा आयात केला आहे. हा कांदा पुढील आठ दिवसामध्ये जेएनपीटीमध्ये पोहचणार आहे. कांदा नाशीवंत असल्यामुळे शासनाने जेएनपीटी बंदरामध्ये एक दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करून कांदा मार्केटमध्ये जाईल अशी व्यवस्था केली आहे. यामुळे पुढील आठवड्यात विदेशातील कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अजूनही इतर देशातून कांदा मागविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इजिप्तचा कांद्याचा दर्जाही चांगला असल्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.