तस्करीसाठी आणलेल्या ८३ बालकांची सुटका

By Admin | Updated: December 16, 2014 03:45 IST2014-12-16T03:45:22+5:302014-12-16T03:45:22+5:30

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली.

83 children released for smuggling | तस्करीसाठी आणलेल्या ८३ बालकांची सुटका

तस्करीसाठी आणलेल्या ८३ बालकांची सुटका

मुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली. यामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश असून, कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांतील अल्पवयीन मुलांच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक पालक काही रुपयांसाठी आपल्या मुलांना एजंट लोकांच्या हाती देऊन मुंबईसारख्या शहरात पाठवतात. अशाच प्रकारे बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातून काही अल्पवयीन मुलांना कामासाठी मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेला मिळाली होती. या संस्थेचे काही कार्यकर्ते अनेक दिवसांपासून यावर लक्ष ठेवून होते. त्यानुसार शनिवारी १५० अल्पवयीन मुलांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती बिहारमधील कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांना दिली.
सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही सर्व मुले जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत दाखल होणार होती. त्यामुळे ‘प्रथम’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब कुर्ला रेल्वे पोलिसांना सांगितली. पोलिसांनीदेखील याबाबत तत्काळ दखल घेऊन आज पहाटे ५ वाजल्यापासूनच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सापळा रचला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही गाडी सकाळी ६ऐवजी ११ वाजता आली. पोलिसांनी त्यांची तत्काळ चौकशी केली असता, त्यांच्यासोबत त्यांचा कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यातील काही मुले ही १७ वर्षांपेक्षा अधिक वयाची होती, त्यामुळे पोलिसांनी काही मुलांना सोडून दिले. मात्र यातील ८३ मुले ही १४ वर्षांखालील असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच या वेळी पोलिसांनी या मुलांना घेऊन येणाऱ्या ३३ जणांनादेखील ताब्यात घेतले.
या सर्व मुलांना धारावी, गोवंडी आणि मानखुर्दसारख्या परिसरात असलेल्या बेकऱ्या, हॉटेल्स आणि काही कारखान्यांमध्ये नोकरीला ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ संस्थेच्या मॅनेजर शर्मिष्ठा खंडागळे यांनी दिली. तसेच यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून, याबाबत योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय थोपवळकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 83 children released for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.