मूर्तिजापूर तालुक्यातील ८१६ सिंचन विहिरी रद्द
By Admin | Updated: June 30, 2016 00:11 IST2016-06-30T00:11:40+5:302016-06-30T00:11:40+5:30
उपमुकाअ यांनी दिलेल्या अहवालात निधीचे नियमबाहय़ पद्धतीने वाटप झाल्याचा ठपका.

मूर्तिजापूर तालुक्यातील ८१६ सिंचन विहिरी रद्द
राजेश शेगोकार/ अकोला
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना सिंचनासाठी विहिरी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना दिलेले निकष पूर्ण केले नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यात मंजूर केलेल्या ८१६ सिंचन विहिरी रद्द करण्याची शिफारस पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी अहवालात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण तालुक्यातील विहिरी रद्द होण्याचा हा विदर्भातील पहिलाच प्रकार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. तीन लाख रुपये एका विहिरीसाठी अनुदान मिळत असल्याने शेतकर्यांसाठी ही योजना संजीवनी देणारी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थींची निवड करताना शासनाने लाभार्थींचा प्राधान्यक्रम दिला आहे. प्रत्येक गावासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार विहिरींचा लक्ष्यांक दिला आहे. या लक्ष्यांकानुसारच विहिरींचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा आहे. मूर्तिजापूर तालुक्यात ८१६ सिंचन विहिरी मंजूर करताना यामधील एकही निकष पाळल्या गेलेला नाही. ग्रामसभेने सिंचन विहिरी मंजूर करण्यासाठी निवडलेल्या लाभार्थींच्या यादीमध्ये असलेला प्राधान्यक्रमही तत्कालिन गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी बदलवून टाकला आहे. तालुक्याला दिलेले लक्ष्यांक पूर्ण करताना येथील अधिकार्यांनी गावनिहाय लक्ष्यांकाचे भान ठेवलेले नसल्याने सिंचन विहीर देण्यामागचा शासनाचा उद्देशच धोक्यात आला आहे.