८० प्रवासी विमानातच खोळंबले
By Admin | Updated: October 9, 2015 05:20 IST2015-10-09T05:20:54+5:302015-10-09T05:20:54+5:30
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

८० प्रवासी विमानातच खोळंबले
औरंगाबाद : विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी या कंपनीच्या विमानाने तिरुपतीला गेलेल्या ८० प्रवाशांना खराब हवामानाचे कारण देत हैदराबादमध्ये वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत प्रवासी हैदराबाद विमानतळावर विमानातच बसून होते.
चिकलठाणा विमानतळावरून गुरुवारी दुपारी ३.३० वाजता टर्बो मेघा एअरवेज कंपनीच्या विमानाने तिरुपतीसाठी ८० प्रवासी रवाना झाले. हे विमान हैदराबादला पोहोचल्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानाने तिरुपतीसाठी उड्डाण घेतले; परंतु काही वेळेनंतर हे विमान पुन्हा हैदराबाद विमानतळावर परत आले. खराब हवामान आणि पावसामुळे विमान परत आणल्याची माहिती यावेळी प्रवाशांना देण्यात आली. विमान हैदराबाद विमानतळावरच उभे करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत विमान तिरुपतीकडे रवाना होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आंदोलनाची भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत प्रवासी विमानातच बसलेले होते. ८० प्रवाशांमध्ये जवळपास २२ प्रवासी हे शहरातील आहेत. कंपनीने कोणतीही सुविधा दिली नाही, असे प्रवाशांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
कंपनी म्हणते खराब हवामानामुळे...
खराब हवामानामुळे विमान तिरुपतीहून हैदराबादला परत
आले. प्रवाशांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था क रण्याची आमची तयारी आहे; परंतु प्रवाशांनी त्यास प्रतिसाद दिला नाही, असे टर्बो मेघा एअरवेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश यांनी सांगितले.