मुंबई : शाळेत निघालेल्या बापलेकीला भरधाव टँकरने चिरडण्याची घटना गोवंडीच्या बैंगनवाडी सिग्नलवर घडली. या अपघातात आठ वर्षांची चिमुरडी जागीच ठार झाली तर तिचे वडील गंभीररीत्या जखमी झाले.बैंगनवाडी परिसरात राहणारी झोया शेख रस्त्यापलीकडील देवनार पालिका वसाहतीतील शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत होती. सकाळी ७च्या सुमारास झोयाला शाळेत सोडण्यासाठी तिचे वडील निघाले होते. बैंगनवाडी चौकातून रस्ता ओलांडताना घाटकोपरहून मानखुर्दच्या दिशेने भरधाव निघालेल्या टँकरने दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत झोयाचा जागीच मृत्यू झाला तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. पादचाऱ्यांनी दोघांना उपचारार्थ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. झोयाला तेथे मृत घोषित करण्यात आले तर तिच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर टँकरचालक पसार झाला होता. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी त्याचा शोध घेत दुपारी घाटकोपर परिसरातून त्याला अटक केली. एकनाथ कांबळे (३५) असे त्याचे नाव आहे.अत्यंत रहदारीचा जोडरस्ता ओलांडण्यासाठी एकही पादचारी पूल, स्कायवॉक किंवा सब-वे नाही. त्यामुळे सिग्लन लागल्यावर रस्ता ओलांडण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने कधीही, कुठूनही रस्ता ओलांडण्याशिवाय जनतेकडे पर्याय नाही. त्यामुळे या मार्गावर असे अनेक अपघात घडत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)
टँकरच्या धडकेत आठवर्षीय चिमुरडीचा मृत्यू
By admin | Updated: January 30, 2015 05:20 IST