एसटीची वाट पाहणा-या ८ जणांना कंटेनरने चिरडले
By Admin | Updated: November 17, 2014 04:36 IST2014-11-17T04:36:26+5:302014-11-17T04:36:26+5:30
सातारा जिल्ह्यातील पारगाव येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बसची वाट पाहणाऱ्या ८ प्रवाशांवर रविवारी काळाने अनपेक्षित घाला घातला.

एसटीची वाट पाहणा-या ८ जणांना कंटेनरने चिरडले
शिरवळ (सातारा) : सातारा जिल्ह्यातील पारगाव येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बसची वाट पाहणाऱ्या ८ प्रवाशांवर रविवारी काळाने अनपेक्षित घाला घातला. भरधाव कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली आठ जण चिरडून जागीच ठार झाले. रविवारी दुपारी ही घटना घडली. दुर्घटनेनंतर पळून गेलेला कंटेनरचालक नवनाथ आजिनाथ गीत (रा. खंदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई) यास पोलिसांनी संध्याकाळी अटक केली.
नेहा बापू वाघमारे, प्रमोद बापू वाघमारे (रा. सुखडे), शरिफा ऊर्फ हवाबी फकीर महमंद मांजोरी-कच्छी, शबाना फकीर महमंद मांजोरी-कच्छी (दोन्ही रा.लोणंद, मूळ रा.चिरागनगर,घाटकोपर,मुंबई), सलमा आयुब खान-कच्छी (५२, रा. लोणंद, मूळ रा. भिलाई, मध्य प्रदेश), हलिमा मोहंमद पटेल (४५, रा. कण्हेरी, मूळ रा. घाटकोपर, मुंबई), शकिनाबाई हरुणशेठ कच्छी (७५, रा. लोणंद) हे खंडाळा तालुक्यातील व अविनाश ज्ञानेश्वर गेडाम (२0, रा. रत्नापूर, ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. नेहा व प्रमोद सख्खे भाऊ-बहीण आहेत. परळ आगाराची एसटी बस विट्यावरून परळकडे निघाली होती. ही बस पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव येथे प्रवासी घेण्यास थांबली. त्याच वेळी भरधाव कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटला व तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून बसच्या पाठीमागील प्रवाशांवर पडला.
दरम्यान, मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली. (प्रतिनिधी)