८ शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे दत्तक घेणार
By Admin | Updated: May 14, 2017 22:52 IST2017-05-14T22:52:08+5:302017-05-14T22:52:08+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे कुटुंब देशोधडीला लागते

८ शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे दत्तक घेणार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे कुटुंब देशोधडीला लागते. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे राज्यातील 8 शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे दत्तक घेण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत असते. त्यामुळे मुले शिक्षण घेऊ शकत नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुक्त विद्यापीठाद्वारे मोफत शिक्षण देण्यात येईल, असेदेखील वायुनंदन यांनी यावेळी सांगितले. मुक्त विद्यापीठाद्वारे कृषी विषयांवर अभ्यासक्रम असून संशोधनाचीदेखील चांगली सोय आहे. त्याचा उपयोग राज्यातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेदेखील ते म्हणाले.
शेतकऱ्यांना सल्ला देणार
राज्यातील 8 गावे आम्ही दत्तक घेणार असून नागपूर विभागीय केंद्रात वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून देणे, शेतकऱ्यांच्या मुलांना विविध कृषी अभ्यासक्रम, पीक पाणी, खते, नैसगिक शेती आणि इतर विविध गोष्टींची माहिती नि:शुल्क देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. वायुनंदन यांनी दिली.