८९ दृश्यांना कात्री कशासाठी?
By Admin | Updated: June 10, 2016 05:35 IST2016-06-10T05:35:15+5:302016-06-10T05:35:15+5:30
‘उडता पंजाब’ चित्रपटातील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना का केली, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले.

८९ दृश्यांना कात्री कशासाठी?
मुंबई : ‘उडता पंजाब’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने हाताळलेला विषय लक्षात घेता त्यातील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना का केली, याचे स्पष्टीकरण गुरुवापर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी सेन्सॉर बोर्डाला दिले.
‘उडता पंजाब’ हा पंजाबची प्रतिमा खराब करणारा चित्रपट आहे, असा शेरा मारत सेन्सॉर बोर्डाने यामधील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना केली. १७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सेन्सॉर बोर्डाने आयत्या वेळी ही सूचना केल्याने अनुराग कश्यप यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या शीर्षकामधून ‘पंजाब’ वगळण्याची सूचना निर्माते व दिग्दर्शकांना केली. तसेच सुरुवातीच्या दृश्यामध्ये दिसणारा ‘पंजाब’ हटवण्याची सूचना केली आहे. पंजाबमधील अमली पदार्थांची होणारी विक्री आणि त्या विळख्यात अडकलेले लोक हा चित्रपटाचा विषय आहे. पुनर्विचार समितीने १३ दृश्ये कापण्याची सूचना दिली होती, अशी माहिती सेन्सॉरच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. यावर समाधान न झाल्याने खंडपीठाने संपूर्ण माहिती घेऊन युक्तिवाद करण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी आहे. (प्रतिनिधी)
>पंजाब केवळ ड्रग्ससाठी?
पंजाब हा केवळ ड्रग्ससाठीच ओळखला जातो का? ‘गो, गोवा, गॉन’ या चित्रपटामध्येही गोव्यामध्ये बंदी घातलेले ड्रग्स कशाप्रकारे मिळते आणि लोक त्याचे सेवन करतात, हे दाखवले आहे. याचाच अर्थ हा चित्रपट गोव्याची प्रतिमा खराब करत आहे का?, असा प्रश्न खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला केला.