दीड महिन्यात ‘स्वाईन’चे ७९ बळी
By Admin | Updated: February 19, 2015 01:48 IST2015-02-19T01:48:57+5:302015-02-19T01:48:57+5:30
राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते,

दीड महिन्यात ‘स्वाईन’चे ७९ बळी
मुंबई : राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
२७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ९० हजार ८८६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
पुण्यात तरूणाचा मृत्यू
पुण्यात बुधवारी स्वाइन फ्लूच्या आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे. बुधवारी ८ नवे रुग्ण सापडले असून रुग्णालयात दाखल असलेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
लातूरमध्ये एक बळी
शासकीय सर्वोपचार रुग्णालयात संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२, रा. गणेशनगर, अहमदपूर) या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. यापूर्वी अहमदपुरातीलच एका महिलेचा स्वाईन फ्यूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला आहे़
नाशिकमध्ये प्रशासन सक्रिय
जिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आहे. आजाराचे गांभीर्य जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने सर्व तहसीलदारांना सूचना देऊन तालुका पातळीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा व उपाययोजना करण्याचे आदेश दिले, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली.
‘सिरम’ बनविणार स्वाइन फ्लूवरील ३ लाख लस
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्वाइन फ्लूने पुन्हा थैमान माजवण्यास सुरूवात केल्याने त्याला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील सिरम इन्टिट्यूट आॅफ इंडियाने ही लस बनविण्यास सुरूवात केली असून ३ लाख डोस बनविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
स्वाइन फ्लूवर लस प्रभावी ठरत असल्याने त्याची मागणी सर्वाधिक आहे. २००९ मध्ये महाराष्ट्रासह देशात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने त्यावरील लस तयार केली होती आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले होते. मात्र गेल्या ३ वर्षांत त्याची मागणी घटल्याने उत्पादन केलेल्या १ लाख ८४ हजार लसींची एक्स्पायरी डेट झाल्याने त्या सिरमने नष्ट केल्या होत्या. आता पुन्हा मागणी वाढल्याने त्याचे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. जाधव म्हणाले, पहिल्या बॅचमधील लसीचे उत्पादन पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळेत आता त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते बाजारात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्शासकीय सर्वोपचार रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’ संशयित म्हणून उपचार घेत असलेल्या आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला़ आता सर्वोपचार रुग्णालयात एकूण ८ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे.
च्निलंगा तालुक्याच्या मालेगाव येथील मीना बालाजी इनकर (४०) यांना १६ फेब्रुवारी रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी अहमदपूर येथील गणेश नगरातील संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’कडून दोघींचाही वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़