७० लाखांची रोकड पकडली
By Admin | Updated: October 10, 2014 01:02 IST2014-10-10T01:02:58+5:302014-10-10T01:02:58+5:30
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज महाल परिसरात ७० लाखांची रोकड पकडली. ही रोकड घेऊन जाणारी कार आणि कारचालक दोघांनाही ताब्यात घेऊन कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

७० लाखांची रोकड पकडली
महाल परिसरात कारवाई : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नागपूर : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज महाल परिसरात ७० लाखांची रोकड पकडली. ही रोकड घेऊन जाणारी कार आणि कारचालक दोघांनाही ताब्यात घेऊन कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. विशेष म्हणजे, या कारवाईचे वृत्त बाहेर जाऊ नये म्हणून कोतवालीच्या ठाणेदाराने प्रयत्न केले. वारंवार संपर्क करूनही पत्रकारांना ते माहिती देत नव्हते. त्यांची ही लपवाछपवी संशयास्पद ठरली आहे.निवडणुकीत होणारा पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकातील एक पथक आज महाल परिसरात गस्त घालत होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांना एक स्वीफ्ट कार दिसली. पथकातील पोलिसांकडे लक्ष जाताच कारचालक गडबडला आणि वेगात जगनाडे चौकाकडे निघाला. त्यामुळे भरारी पथकाला संशय आला. त्यांनी पाठलाग करून जगनाडे चौकाच्या अलीकडेच ही कार अडवली. कारची पाहणी केली असता त्यात हजार, पाचशे आणि शंभरांच्या नोटांची बंडलं आढळली. वाहनचालकाने घटनास्थळी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे त्याला कार आणि रकमेसह कोतवाली ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात कारमधून काढण्यात आलेली रक्कम मोजणे सुरू झाले. ही माहिती पसरताच उपराजधानीत उलटसुलट चर्चेला उधाण आले. (प्रतिनिधी)
डीसीपी निर्मलादेवींची नजर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महालमध्ये अशाच प्रकारे ३० ते ४० लाखांची रोकड पकडण्यात आली होती. यावेळीसुद्धा कोतवाली पोलिसांनी संशयास्पद भूमिका वठवली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी लगेच या प्रकरणावर नजर रोखली. त्यांनी लगेच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत माहिती दिली. त्यानुसार, प्राप्तिकर खात्याची चमू कोतवाली ठाण्यात पोहचली. दरम्यान, जप्त करण्यात आलेली रक्कम ७० लाख असल्याचे सांगून ही रक्कम आणि रकमेशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डीसीपी निर्मलादेवी यांनी लोकमतला सांगितले.
कोतवाली पोलिसांची भूमिका संशयास्पद
या संदर्भात नेमकी माहिती काय आहे, ते विचारण्यासाठी कोतवालीचे ठाणेदार जगताप यांना दुपारपासून रात्रीपर्यंत पत्रकारांनी वारंवार माहिती विचारली. मात्र, त्यांनी प्रारंभी आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगून फोन कापला. ही रोकड निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यासाठी नेली जात होती, अशी खुद्द पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारीच चर्चा करीत होते. ठाणेदार जगताप यांची मात्र लपवाछपवी सुरू होती. ही रक्कम कुणाची, ती कुणाकडून कुठे पोहचवली जात होती, रोकड नेणारी कार कुणाची, कारमध्ये प्रचाराचे साहित्य होते काय, यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ठाणेदार जगताप यांनी देण्याचे टाळले. सापडलेल्या रकमेबाबत आयकर खात्याला कळविण्यात आल्याची माहिती मध्य नागपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. राठोड यांनी दिली.