फाटकांसह ७ जणांवर कारवाई ?

By Admin | Updated: July 21, 2014 03:04 IST2014-07-21T03:04:01+5:302014-07-21T03:04:01+5:30

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते

7 people including gates action? | फाटकांसह ७ जणांवर कारवाई ?

फाटकांसह ७ जणांवर कारवाई ?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रविंद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल तातडीने प्रदेश काँग्रेस कमिटीसह कोकण विभागीय आयुक्तांकडेही देण्यात येणार असून सातही जणांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर कारवाई मागणी करणार असल्याची माहिती ठाणे शहर काँग्रेसने ‘लोकमत’ला दिली.
एकीकडे नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली असतांनाच त्यांचे ठाण्यातील एकेकाळचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक यांनी मात्र त्यांची पत्नी जयश्री, कांचन चिंदरकर, मनप्रित कौर, राजा गवारी, मीनल संख्ये आणि दिपक वेतकर या सहा नगरसेवकांसह शैलेश सावंत, मधुकर होडावडेकर हे दोन माजी नगरसेवक तसेच शिक्षण मंडळ सदस्य यशवंत साळवी अशा १५ ते २० प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसला सोडून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सात नगरसेवकांच्या जाण्याने आघाडीचे संख्याबळ आता ६५ वरुन ५८ झाले आहे. तर काँग्रेसचे संख्याबळ हे १८ वरुन ११ झाले.
दुसरा धक्का
महापालिका निवडणूक होताच राजन किणे यांच्या पत्नी अनिता किणे या ऐन महापौर निवडणुकीच्या वेळी शकीला कुरेशी यांच्यासह गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. किणे दांम्पत्यांसह कुरेशी यांचेही नगरसेवक पद रद्द
झाले होते. त्याजागी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी काँग्रेसने अनिता किणे आणि शकीला कुरेशी या दोघींना तिकीट नाकारले होते. मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले राजन किणे मात्र प्रभाग ५९ मधून बिनविरोध निवडून आले.
अनिता किणे यांच्या जागी झालेल्या निवडणुकीत प्रभाग
५७ मधून काँग्रेसच्याच आयेशा कुरेशी तर शकीला यांच्या जागीही काँग्रेसच्याच रेश्मा पाटील विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही
जागा राखण्यात काँग्रेसला यश
आले होते. आता फाटक यांच्यासह सात नगरसेवकांनी ऐन विधानसभा आणि महापौर निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला ‘हात’ दाखविल्याने त्यांच्यावर कारवाईची तयारी शहर काँग्रेसने सुरु केली आहे. रविवारी या सदंर्भात झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फाटक यांच्या बाजूने आणखी ५ नगरसेवक आले तर त्यांचा १२ जणांचा एक गट बनू शकतो, अशीही एक अटकळ आहे. मात्र, सध्या तरी तसे काहीच घडणार नसल्याचा दावा शहर काँगे्रसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या सातही नगरसेवकांवर तातडीने कारवाईची नोटीस बजावून प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तसा अहवाल पाठविण्यात येणार आहे. तसेच पक्षांतर बंदीचा कायदा मोडल्याच्या कारणास्तव या सातही जणांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्त राध्येशाम मोपलवार यांच्याकडे पत्र देणार असून त्यावर तातडीने कारवाईची कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: 7 people including gates action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.