राज्यात स्वाइन फ्लूचे ६७८ रुग्ण - आरोग्यमंत्री
By Admin | Updated: February 20, 2015 01:06 IST2015-02-20T01:06:59+5:302015-02-20T01:06:59+5:30
राज्यात आतापर्यंत ६७८ रुग्णांची स्वाइन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह आली असून, ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

राज्यात स्वाइन फ्लूचे ६७८ रुग्ण - आरोग्यमंत्री
नागपूर : राज्यात आतापर्यंत ६७८ रुग्णांची स्वाइन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह आली असून, ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. ५०पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी इस्पितळांमध्ये या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे व रुग्णाचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली.
स्वाइन फ्लूवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपूरमधील स्वाइन फ्लू नमुन्याचे खासगी तपासणीचे शुल्क अर्ध्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात ५०पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या इस्पितळांनी स्वाइनच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्यमंत्र्यांची पाठ
राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. सर्वांत जास्त रुग्ण मेडिकलच्या स्वाइन फ्लू वॉर्डात आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी डॉ. दीपक सावंत मेडिकलमध्ये आले व तेथे बैठक घेतली. परंतु स्वाइन फ्लू वॉर्डाला भेट न देताच निघून गेले. यामुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
४० रुग्णांची स्थिती गंभीर
जानेवारी ते आतापर्यंत राज्यात ९७ हजार २४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात स्वाइन फ्लूच्या
६ हजार ८८६ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले. महाराष्ट्रात उपचार घेत असताना इतर राज्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मध्य प्रदेशातील ६, गुजरातमधील १, आंध्र प्रदेशातील १ आणि उत्तर प्रदेशातील एका रुग्णाची नोंद आहे.
राज्यात सध्याच्या घडीला २०५ रुग्ण भरती आहेत. यातील ४० रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ११७ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.