जैन सहेली मंडळाच्या शिबिरात ६२६ रुग्णांची नि:शुल्क तपासणी
By Admin | Updated: October 9, 2014 01:04 IST2014-10-09T01:04:10+5:302014-10-09T01:04:10+5:30
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन सहेली मंडळाच्यावतीने बुधवारी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

जैन सहेली मंडळाच्या शिबिरात ६२६ रुग्णांची नि:शुल्क तपासणी
२१९ चष्म्यांचे वाटप : उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन सहेली मंडळाच्यावतीने बुधवारी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील २१९ जणांना नि:शुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोगाशी संबंधित २०० वर रुग्णांच्या आजाराचे निदान करून त्यांना पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये तर हृदय व पोटाच्या आजाराच्या गंभीर रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बोलविण्यात आले. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याच्या या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिराचे सकाळी उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, महात्मे नेत्रपेढी व इस्पितळाचे संस्थापक संचालक पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ. सुनिता महात्मे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ. रिना दरगन, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर गुप्ता, बुटीबोरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, इंडोरामा कंपनीचे क्षेत्रप्रमुख अजय गुप्ता, इंडोरामा कंपनीच्या सिंथेटिक विभागाचे अधिकारी प्रभोत ओझा, इंडोवर्थचे अध्यक्ष एन.सी. चक्रवर्ती व सामाजिक कार्यकर्ता मुजीब पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा होत्या.
पोलीस अधीक्षक डॉ. सिंग यांनी जैन सहेली मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या आरोग्य शिबिराची खरी गरज ग्रामीण भागातच आहे. यातच महिला आणि लहान मुलांसाठी घेतलेले हे आरोग्य शिबिर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. डॉ. महात्मे म्हणाले, या शिबिरातून मोतीबिंदूच्या रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया तर इतर डोळ्यांच्या आजारावर इस्पितळांकडून उपचार केले जातील. अशा शिबिरांमधून दुर्बल, गरीब रुग्णांची सेवा होत असल्याने यातून मिळणाऱ्या आनंदाला मोल नाही.
डॉ. निसवाडे म्हणाले, ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या अशा शिबिरांमुळे रुग्णांना मोठा फायदा मिळतो. या शिबिरात आढळून आलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून अद्ययावत उपचार केले जातील. डॉ. गुप्ता म्हणाले, अतिविशेषोपचाराची गरज असलेल्या रुग्णांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय विविध शासकीय योजनेतून मदत उपलब्ध करून देईल.
यावेळी प्राचार्य डॉ. दरगन यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा यांनी केले. मंडळाच्या सचिव रजनी शहलोत यांनी संचालन तर आभार मंडळाच्या सदस्या अर्चना झव्हेरी यांनी मानले.
शिबिराचे योग्य नियोजन व शिस्तबद्धतेचे उपस्थित मान्यवरांसोबतच शिबिरार्थीनीही कौतुक केले. महात्मे नेत्रपेढी इस्पितळाच्यावतीने उपस्थितांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्यावतीने बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग व औषधवैद्यकशास्त्र तज्ज्ञाकडून सेवा देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या कोषाध्यक्ष अनुजा छाजेड, उपाध्यक्ष वर्षा पारेख, सहसचिव स्मिता मुणोत, सदस्या नीना जैन, अमिषा गुंडेचा, रितीका सिंघवी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जैन सहेली मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या तारादेवी चोरडिया, किरण दर्डा, संतोष भंडारी, सुनीता ढड्डा, हेमलता गुंडेचा, डॉ. शैला गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता कृष्णा इंगळे, रणजितसिंग बघेल, डॉ. विनोद बोरा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रत्येक रविवारी नि:शुल्क आरोग्य सेवा
प्रत्येक रविवारी सकाळी १० ते १२ या वेळात बुटीबोरी येथील या जैन सहेली मंडळाच्या सभागृहात प्रसिद्ध फिजिशियन डॉ. संजय दर्डा व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिता दर्डा आपली नि:शुल्क सेवा देणार आहेत. या निमित्ताने त्यांचा सत्कार पद्मश्री डॉ. विकास महात्मे व डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते करण्यात आला.
१६ रुग्णांवर नि:शुल्क मोतीबिंदूची शस्त्रक्रिया
नेत्रतपासणीमध्ये मोतीबिंदूचे १६ रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर महात्मे नेत्रपेढी व इस्पितळाकडून लवकरच नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिवाय शंभरावर रुग्णांना डोळ्यांचे विविध आजार आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठीही इस्पितळात बोलविण्यात आले आहे.
यांनी दिली आपली सेवा
मेडिकल रुग्णालयाकडून डॉ. अनिल हुमणे, डॉ. अर्चना अहेर, डॉ. विनय पंचलवार, डॉ. अनुराग गुप्ता, डॉ. ए. एस. बागुल, डॉ. एम.एम. बोरकर, डॉ. रितेश सातारडे, अनिल कुलकर्णी व राजू लुटे यांनी तर महात्मे नेत्रपेढी व इस्पितळाकडून डॉ. रॉली कांबळे, मोहन खराबे, सतीश बुरघाटे, डॉ. शितल, डॉ. स्वाती, नीलेश, नीलम, समीर वैद्य, हर्षाली घोडेराव, नितीन पडोळे, मीनाक्षी, छाया, सुवर्णा व प्रितीशा यांनी आपली सेवा दिली.
दंत चिकित्सा शिबिरासाठी मिळाली प्रेरणा
प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. प्रतिभा शेणॉय व डॉ. रामकृष्ण शेणॉय यांना या आरोग्य शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून दंत चिकित्सा शिबिर घेण्याची प्रेरणा मिळाली. या दाम्पत्याने खासदार विजय दर्डा यांच्याकडे आपली ही भावना बोलून दाखविली.