६ हजारावर घरात आढळले डेंग्यूचे डास
By Admin | Updated: October 13, 2014 01:18 IST2014-10-13T01:18:02+5:302014-10-13T01:18:02+5:30
शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १३६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे, असे असताना नागरिक आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

६ हजारावर घरात आढळले डेंग्यूचे डास
हिवताप व हत्तीरोग विभाग : अडीच लाखाच्यावर घरांची केली तपासणी
नागपूर : शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १३६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे, असे असताना नागरिक आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला मागील २६ दिवसांत ६ हजार ७९९ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. यात विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठे पाणी साचले आहे का, याची तपासणी करून लोकांना मार्गदर्शन करीत आहे. एकीकडे डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना नागरिक मात्र याला गंभीरतेने घेत नसल्याचे विभागाच्या चमूला आढळून आले आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर पर्यंत २ लाख ५५ हजार ९७१ घरांची तपासणी केली असता ६ हजार ७९९ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वसाहतींमध्ये जिथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले त्या भागांच्या ४ हजार ७६१ घरांना भेटी दिल्या असता यातील २४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या तर तापाचे १० रुग्ण या चमूला आढळून आले. भेंडे ले-आऊट, खामला, सीताबाई नगर, मानव नगर, सुर्वे नगर, धोटे नगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर आदी ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. हिवताप व हत्तीरोग विभागाचे अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू आहे. (प्रतिनिधी)