पुण्यात तब्बल ६० बोकडांची चोरी
By Admin | Updated: September 3, 2016 21:49 IST2016-09-03T21:49:54+5:302016-09-03T21:49:54+5:30
बकरी ईदचा सण जवळ आलेला असल्याने कुर्बानीसाठी आणलेल्या तब्बल 60 बोकडांची दोघाजणांनी शहराच्या विविध भागांमधून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

पुण्यात तब्बल ६० बोकडांची चोरी
>- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - ‘ पुणे तेथे काय उणे’ अशी म्हण अस्तित्वात असल्यामुळे नवल करायला लावणा-या किस्स्यांनाही तेथे कमी नाही. बकरी ईदचा सण जवळ आलेला असल्याने कुर्बानीसाठी आणलेल्या तब्बल 60 बोकडांची दोघाजणांनी शहराच्या विविध भागांमधून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्या तावडीमधून एक बकरी आणि तीन बोकडांची सुटका करण्यात आली आहे.
इरफान महंमद फुलखान (वय 23, रा. लोणी काळभोर, घोरपडे वस्ती) आणि इरफान फकीरमहम्मद कुरेशी (वय 27, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहसीन खलील बागवान (वय 32, रा. म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान यांनी बकरी ईदसाठी एक बोकड विकत आणले होते. हे बोकड त्यांनी घराजवळ बांधलेले असताना कोणीतरी टेम्पोमध्ये घालून चोरुन नेले होते. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला होता. बकरी ईद जवळ आल्याने अनेकांनी खरेदी केलेल्या बोकडांची चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात अशा प्रकारे 60 बोकड चोरीला गेल्याचे समोर आले.
या चोरीसाठी वापरलेल्या पोलिसांनी माग काढत फुलखान आणि कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी आतापर्यंत चोरलेली बोकडे विकल्याचे सांगितले.