व्हॅट रद्दमुळे सांगलीत झाली ६० कोटींची बचत...
By Admin | Updated: March 19, 2015 23:56 IST2015-03-19T22:53:55+5:302015-03-19T23:56:55+5:30
शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा : सांगलीतील व्यापार वाढीला चालना, मार्केट यार्डात उत्साह

व्हॅट रद्दमुळे सांगलीत झाली ६० कोटींची बचत...
अंजर अथणीकर - सांगली राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेदाणा, हळद व गुळावरील लागू होणारा व्हॅट रद्द केल्याने, सांगलीतील व्यापारी व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जवळपास ६० कोटींहून अधिक रुपयांचा बसणारा भुर्दंड वाचला आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशाला बसणारी चाटही वाचली आहे. सांगलीतील मार्केट यार्डमधून चालणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारामध्ये बेदाणा, हळद, गूळ या शेतीमालाचा समावेश आहे. हळदीच्या बाजारासाठी सांगली हे महत्त्वाचे केंद्र आहे. आता बेदाण्याबरोबरच गुळासाठीही सांगली ही महत्त्वाची बाजारपेठ ठरत आहे. सांगलीमध्ये हळदीची वर्षाला सुमारे आठ ते नऊ लाख पोत्यांची (एक पोते : ७० किलो) उलाढाल होत असते. हळदीची सुमारे ४०० ते साडेचारशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. त्याचबरोबर बेदाण्याची सुमारे आठशे ते नऊशे कोटी रुपयांची उलाढाल असून, गुळाची सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची उलाढाल आहे. चार वर्षापूर्वी बेदाण्यावर चार टक्के व्हॅट लावण्यात आला होता. गुळावरही व्हॅट होता. अनेक आंदोलने व मागण्यांनंतर तो आघाडी सरकारने रद्द केला. आता हळदीसह गूळ, बेदाण्यावर तीन ते चार टक्के व्हॅट (मूल्यवर्धित कर प्रणाली) लागू करण्याचा शासनाचा मानस होता. मात्र खा. संजय पाटील यांच्यासह सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच या शेतीमालावरील व्हॅट रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गेल्या आठ वर्षापासून बेदाणा, हळद, गूळ यावर आकारण्यात येणारा व्हॅट प्रत्येक अर्थसंकल्पात रद्द करण्यात आला होता. व्हॅट रद्द झाल्याने सांगलीमध्ये होणाऱ्या हळदीवरील सुमारे बारा ते पंधरा कोटी, बेदाण्यावरील सुमारे ३६ कोटी व गुळावर लागू होणारा सुमारे दहा कोटी व्हॅट आता वाचला आहे. यामुळे आता व्यापार वाढीसाठी तर चालना मिळणार आहेच, शिवाय कर्नाटकात व्यापार स्थलांतरित होण्याची भीतीही कमी झाली आहे.
हळदीवरील व्हॅट रद्दने सुमारे बारा ते पंधरा कोटी रुपयांची शेतकऱ्यांची बचत झाली आहे. या निर्णयाने व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर व्यापार कर्नाटकात स्थलांतरित होण्याची भीती नाहीशी झाली आहे. यामुळे आता हळद व्यापाराला दिलासा मिळाला आहे.
- मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली
सांगली जिल्ह्यामध्ये आठशे ते नऊशे कोटी रुपयांची वर्षाला बेदाण्यामध्ये उलाढाल होत असते. यावर सुमारे चार टक्के व्हॅट कर लागू होण्याची शक्यता होती. यामुळे आता ३५ ते ३६ कोटी वाचले आहेत. यापूर्वी आघाडी सरकारने हा कर रद्द केला होता. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
- राजेंद्र कुंभार, बेदाणा व्यापारी असोसिएशन