वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किमी धावणार!

By Admin | Updated: June 30, 2016 04:16 IST2016-06-30T04:16:08+5:302016-06-30T04:16:08+5:30

क्रीडापटू पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील गुरुवारी वयाच्या ५८ व्या वर्षी ३९ वर्षांच्या पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत.

58 km at the age of 58 km will run! | वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किमी धावणार!

वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किमी धावणार!


जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्हा पोलीस दलातील क्रीडापटू पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील गुरुवारी वयाच्या ५८ व्या वर्षी ३९ वर्षांच्या पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. ३० जूनला अलिबाग पोलीस मुख्यालय-कार्लेखिंड-पोयनाड-वडखळ-साई मंदिर(पेण) आणि परत अलिबाग पोलीस मुख्यालय असे ५८ किमी अंतर धावून महाराष्ट्र पोलीस दलासमोर क्षमता सिद्धतेचा आगळा वस्तुपाठ ठेवणार आहेत. रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनीही पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून ते धावण्यास प्रारंभ करणार असल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
१९७७ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल (खेळाडू) म्हणून पाटील दाखल झाले. उत्तम कबड्डीपटू असलेल्या पाटील यांनी चमकदार कामगिरी करत याच रायगड पोलीस दलात ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदापर्यंत मजल मारली. सध्या ते दादर सागरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १९९३ ते २००६ या कालावधीत रायगड जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख म्हणून कार्यरत असताना रायगड पोलीसच्या कबड्डी संघास त्यांनी विशेष प्रशिक्षण दिले आणि या संघाने जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धा जिंकून आगळा विक्रम प्रस्थापित केला होते. रायगड पोलीस दलाबरोबरच महसूल विभागातील खेळाडूंना देखील त्यांनी मैदानी खेळ तसेस कबड्डीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी कारकिर्दीत १०० हून अधिक कबड्डीपटू घडवून आगळा विक्रम देखील केला आहे.
पाटील यांच्या सातत्यपूर्ण विशेष कर्तृत्वाची दखल घेवून सन २०१४ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक तर २०१५ मध्ये अत्यंत मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करुन गौरविण्यात आले आहे.
६२०० बैठका, ३२५३ सूर्यनमस्कारांचा विक्रम
केवळ दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्यापेक्षा स्वकृतीतून खेळाडू घडवण्याकडे त्यांचा कल असून, त्यातून त्यांनी २००६ मध्ये सलग ३ हजार २५३ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला. तर २००८ मध्ये सलग तब्बल ६ हजार २०० जोर (बैठका) मारून विक्रम प्रस्थापित केला. निवृत्ती दिनी पोलीस दलातील तरुण सहकाऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवण्याकरिता आपण ५८ किमी धावणार असल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.

Web Title: 58 km at the age of 58 km will run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.