राज्यात सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस
By Admin | Updated: September 17, 2015 01:35 IST2015-09-17T01:35:44+5:302015-09-17T01:35:44+5:30
राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे.

राज्यात सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस
मुंबई : राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली पण अलिकडे झालेल्या पावसाने किंचित दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २२ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या ८ जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी फक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ८८ तालुक्यात २६ ते ५० टक्के, १८० तालुक्यात ५१ ते ७५ टक्के, ६८ तालुक्यात ७६ ते १०० टक्के आणि १८ तालुक्यात तर १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
राज्यात मूग, उडीद, बाजरीच्या काढणीस सुरु वात
खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४ लाख ७० हजार हेक्टर असून ११ सप्टेंबर अखेर १३१ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९७% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमी पर्जन्यमानामुळे पिकांची वाढ असमाधानकारक असून पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.
(विशेष प्रतिनिधी)
जलसाठ्यांमध्ये ४९ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के साठा होता. प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा ंअसा - मराठवाडा - ८ टक्के (४३), कोकण - ८७ टक्के (९३), नागपूर - ७५ टक्के (७९), अमरावती - ६२टक्के (७४), नाशिक - ४४ टक्के (७७) आणि पुणे - ४९ टक्के (९१), इतर धरणे - ७१ टक्के (९७) असा पाणीसाठा आहे.
१५१५ गावे व ३२२७
वाड्यांना १९९० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२ टँकरद्वारे पुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ५ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ५३० कामे सुरू असून या कामांवर एक लाख १२ हजार ७८४ मजुरांची उपस्थिती आहे.