५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By Admin | Updated: January 14, 2017 04:50 IST2017-01-14T04:50:34+5:302017-01-14T04:50:34+5:30
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा २५ टक्क्यांच्या मोबदल्यावर बदलण्यासाठी आलेल्या सात जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या

५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त
ठाणे : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा २५ टक्क्यांच्या मोबदल्यावर बदलण्यासाठी आलेल्या सात जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. त्या जुन्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या सात जणांमध्ये एका व्यापारी दाम्पत्याचा समावेश असून ते राजापूर येथील रहिवासी आहे. त्या सात जणांची आयकर विभागामार्फत सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वर्तकनगर परिसरात काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस हवालदार नथुराम चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने गुरुवारी रेमण्ड कंपनीच्या वाहन पार्किंग झोनमध्ये सापळा रचून ही कारवाई केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत विधाते, सुखदेव सोनावणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर, नवनाथ वाघमारे व पोलीस नाईक नीशा करांडे या पथकाने एका कारमधून तिघांना, तर दुसऱ्या कारमधून त्या व्यापारी दाम्पत्यासह चौघांना ताब्यात घेतले. या वेळी पहिल्या कारमधून २९ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या एक हजाराच्या ५२१ नोटा, तर ४ हजार ८७९ पाचशे रुपयांच्या नोटा, तर दुसऱ्या कारमधून २४ लाख ९४ हजार ५०० रुपयांच्या एक हजाराच्या ७९५, तर तीन हजार ३९९ पाचशे रुपयांच्या नोटा मिळून आल्या. अशा ५४ लाख ६२ हजारांच्या एकूण जुन्या नोटा आहेत. (प्रतिनिधी)