५५ कोटी धमकावून नेणारे मोकाटच
By Admin | Updated: June 7, 2015 02:19 IST2015-06-07T02:19:27+5:302015-06-07T02:19:27+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून तब्बल ५५ कोटी १८ लाख रुपये काढण्यात आले.

५५ कोटी धमकावून नेणारे मोकाटच
यदु जोशी, मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून तब्बल ५५ कोटी १८ लाख रुपये काढण्यात आले. ही रक्कम काही माणसांनी आमच्याकडून तत्काळ नेली, असे या कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता तपासात सांगितल्याने संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
आम्ही मुख्यालयातून आलेल्या आदेशानुसार रोखीने किंवा आरटीजीएसद्वारे आमच्या नावावर पाठविण्यात आलेली रक्कम काढली पण ती आम्ही घेतली नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही रक्कम बँकेतून काढायचो, महामंडळाच्या मुख्यालयातून आलो आहोत ती रक्कम आम्हाला द्या, असे धमकावले जायचे आणि आम्ही ती त्यांना द्यायचो. हे लोक आमच्याकडून पैसे घेत असल्याचे बँकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांनी महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रमेश कदम यांच्या आदेशाने व्यवहार केल्याचे म्हटले आहे.
या १३ अधिकारी/कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र ते या अफरातफरीत असल्याचे स्पष्ट दिसत असूनही कुणालाच अजून अटक करण्यात आलेली नाही. शिवाय, बेअरर चेकद्वारे कोट्यवधी रुपये काढले कसे गेले?
संबंधित बँकांमधील अधिकाऱ्यांनी या प्रकाराला मान्यता तरी कशी दिली, याची चौकशी होण्याची गरज आहे. बीडसारख्या ठिकाणी एका शाखेतून एकावेळी ५ कोटी रुपये रोखीने काढण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. रोखीने वा आरटीजीएसद्वारे द्यावयाच्या रकमेबाबतचे नियम बँकांनी पाळले नाहीत असे दिसते.
घोटाळ्यांची महामंडळाची कबुली
- महामंडळात २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात आर्थिक अनियमितता, अफरातफर झाली, ही वस्तूस्थिती आहे, असे कबुल करीत अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आज लोकमतला पत्र पाठविले आणि लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. या गैरव्यवहारांची चौकशी तीन स्तरावर सुरू करण्यात आली आहे.
- बीड, जालना, परभणी व बुलडाणा जिल्ह्णात अधिकारी/ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण, महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कागदपत्रांसह पत्र दिले व पाठपुरावाही केला तरी भंडारा व हिंगोली जिल्ह्णात पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत, असे महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी म्हटले आहे.
अशी काढली रक्कम
जिल्हाकाढण्यात आलेली रक्कम (आकडे कोटी रु.)
रोख आरटीजीएसएकूणजिल्हा व्यवस्थापक कार्यालय सचिव
बीड ५.०७१.५२ ६.५९ बापुराव महादेव नेटके श्रावण श्रीपती हातागळे
जालना८.०८०.३६८.४४ मधुकर बाबुराव वैद्य अशोक एकनाथ खंदारे
परभणी३.३००.३६३.६६ एस.जी.गायकवाड सुषमा कसबे/सी.व्ही.डोंगरे
हिंगोली०.५००.३००.८० एस.जी.गायकवाड सुजित शंकरराव पाटील
अतिरिक्त कार्यभार
बुलडाणा६.१९४.८१११.००प्रल्हाद तानबाजी पवारविजय जाधव
भंडारा२४.६९- २४.६९प्रल्हाद तानबाजी पवार शारदा केवलराम कांबळे
एकूण४७.८३७.३५५५.१८
या १३ अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. मात्र या व्यवहारांमागील भ्रष्टाचारी मोकाटच आहेत. ते धमकावणारे लोक कोण होते, ते कोणासाठी पैसा घेऊन गेले याची चौकशी होण्याची गरज आहे.