सिनेस्टाईल पाठलाग करून  ८ लाख रुपये किमतीचा ५३ किलो गांजा जप्त, अमळनेर पोलिसांची कारवाई

By संजय पाटील | Updated: November 18, 2022 11:39 IST2022-11-18T11:39:00+5:302022-11-18T11:39:12+5:30

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे  १७ रोजी रात्री विभागीय गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की जळोद अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकी मध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे.

53 kg of ganja worth Rs 8 lakh seized after chasing Cinestyle, Amalner police action | सिनेस्टाईल पाठलाग करून  ८ लाख रुपये किमतीचा ५३ किलो गांजा जप्त, अमळनेर पोलिसांची कारवाई

सिनेस्टाईल पाठलाग करून  ८ लाख रुपये किमतीचा ५३ किलो गांजा जप्त, अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर :

रात्रीच्या गस्तीत मिळालेल्या माहितीवरून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून  ८ लाख रुपये किमतीचा ५३ किलो गांजा आणि अडीच लाखाची चारचाकी तसेच दीड लाखाची मोटरसायकल ,मोबाईल सह असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा माल पोलिसांनी १८ रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास जळोद रोड वरून जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे  १७ रोजी रात्री विभागीय गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की जळोद अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकी मध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील ,मिलिंद भामरे , दीपक माळी ,रवींद्र पाटील ,सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील याना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी  महाविद्यालयाजवळ सापळा लावला. काही वेळानंतर १८ रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला.

बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. सिनेस्टाईल पाठलाग होत असताना आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला. पोलीस वाहनाच्या प्रकाशात कार मधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन रा गांधलीपुरा हा असल्याची ओळख पटली. त्याच्या सोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले.

पोलिसांनी कार क्रमांक जि जे ०९ ए बी ६८३९ हिची डीक्की उघडली असता त्यात तीन गोन्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्राम वजनाची २५ गांजाची पाकीटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ , बी एक्स ५९२८ आणि दोन  मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील ,पोलीस नाईक शरद पाटील ,शेखर साळुंखे ,सिद्धांत शिसोदे ,उदय बोरसे यांच्या मदतीने शासकीय पंच बोलावून भल्या पहाटे पंचनामा करून तौफिक शेख सह अज्ञात तीन आरोपींवर अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

Web Title: 53 kg of ganja worth Rs 8 lakh seized after chasing Cinestyle, Amalner police action