अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार रुग्ण
By Admin | Updated: August 17, 2014 00:51 IST2014-08-17T00:51:09+5:302014-08-17T00:51:09+5:30
देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते,

अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार रुग्ण
‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ : पहिल्यांदाच एकत्र आले कर्करोग विकीरण तज्ज्ञ
नागपूर : देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, अशी माहिती डॉ. बी.के. मोहंती यांनी दिली.
महाराष्ट्र चॅप्टर अॅण्ड सेंट्रल इंडिया एआरओआय याच्यावतीने दोन दिवसीय ‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या परिषदेच्या निमित्ताने नागपुरात पहिल्यांदाच कर्करोग विकीरण तज्ज्ञ एकत्र आले होते.
डॉ. मोहंती म्हणाले, पुरुष व महिलांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचा क्रमांक पाचवा लागतो. हा कॅन्सर वयाच्या ४० ते ५० व्या वर्षी सर्वात जास्त दिसून येतो. याची भयानकता म्हणजे साधारण ८० टक्के रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. या मागील कारण म्हणजे, जेव्हा रुग्णाला अन्न गिळणे फार कठीण जाते तेव्हाच तो डॉक्टरकडे जातो. यातच अनेक सामान्य डॉक्टर अशा रुग्णांना छाती किंवा घशाचा संसर्ग म्हणून उपचार करतात. यामुळे रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’ला पोहचतो. याचे निदान ‘इंडोस्कोपी’ व ‘सिटी स्कॅन’मधून होते.
वयाच्या ४० व्या वर्षी ज्यांना अन्न किंवा पाणी गिळणे कठीण जात असेल, वजन कमी झालेले असेल, थकवा वाटत असेल, ताप येत असेल अशांनी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. अतितैलिय पदार्थ, लोणची व मसाल्याच्या पदार्थांच्या सेवनाने हा कॅन्सर होतो. महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमी हेही या आजाराला कारणीभूत ठरते.
अत्याधुनिक ‘लिनियर एक्सिलेटर’ची गरज
डॉ. व्ही. कन्नन म्हणाले, २०३० पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २०० ते ३०० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. येत्या १५ वर्षात जगातील ५० टक्के कॅन्सरचे रुग्ण ब्राझिल, रशिया, भारत व चीन या देशात आढळून येऊ शकतात. कॅन्सरची लागण झाल्याचे तपासणीत निदान झाल्यानंतर यावरील उपचारासाठी अत्याधुनिक लिनियर एक्सिलेटरची गरज भासते. दुर्दैवाने भारतात फक्त ३० शहरांमध्येच ही मशीन आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण आहेत. परंतु नागपुरातही ही मशीन नाही. यामुळे येथील रुग्णांना मुंबई, पुणे गाठावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढते रुग्ण व त्यांची आर्थिक स्थिती पाहता भारतात ही मशीन दर ३० किलोमीटरवर असणे आवश्यक आहे.
‘साईड इफेक्ट’चे प्रमाण कमी
डॉ.बी.सी.गोस्वामी व डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी सांगितले, ‘लिनियर एक्सिलेटर’मध्येही आता अॅडव्हॉन्स टेक्नालॉजी आल्याने रेडिएशन देताना साईड इफेक्टचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ‘कोबाल्ट युनिट’ बंद करावे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आजही ‘कोबाल्ट’चा वापर सुरू आहे. आहे त्या मशीनचा चांगल्यात चांगला वापर केल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो, असेही ते म्हणाले.
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी व प्रसिद्ध आॅन्कोलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)