बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे
By Admin | Updated: September 20, 2016 04:16 IST2016-09-20T04:16:34+5:302016-09-20T04:16:41+5:30
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे
मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीने वरळी वगळता नायगांव आणि लोअर परळ येथील चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. रहिवाशांना ५०० चौरसफुटाची घरे दिली जाणार आहेत.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने नायगांव आणि ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या पुनर्विकास प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वरळी येथील बीडीडी चाळींचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्याबाबत निर्णय करण्यात आला नाही, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रस्तावानुसार बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौफुटाचे घरे मिळणार आहेत. ५०० चौफुटांच्या या घरात एक मास्टर बेडरुम, टॉयलेट-बाथरुम आणि हॉलचा समावेश असणार आहे. रहिवाशांच्या घरे उभारल्यानंतर शिल्लक राहणा-या जागेपैकी ६० जागा मध्यम उत्पन्न आणि ३० जागेवर उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी घरे बांधली जातील. तर, उर्वरित १० टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. या पुर्नविकासासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) मध्ये नव्या उपनियमावलीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २० हजार चौफुटाहून अधिक जागेत बांधकाम होणार असल्याने पर्यावरण विभागाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. उच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.
बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा घोळ अनेक वर्षांपासून सुरु होता. एकीकडे राजकीय पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण तर दुसरीकडे रहिवाशांच्या मागण्या या कचाट्यात हा प्रकल्प रखडला होता. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सत्ताधारी पुर्नविकासाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहेत. लवकरच वरळी येथे एका जाहिर सभेत पुर्नविकासाची अंतिम घोषणा करण्याची तयारी भाजपाने चालविली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
ब्रिटीशांनी १९२० साली तब्बल बीडीडी चाळीच्या २०७ इमारती उभारल्या होत्या. वरळी, शिवडी-नायगांव, आणि ना.म.जोशी मार्ग अशा एकूण ९३ एकर परिसरात या चौमजली चाळी उभ्या आहेत. अवघ्या १६० फुटांच्या १६ हजार ५५४ सदनिका येथे आहेत. (प्रतिनिधी)
>मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर कामास गती
उच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.