मुंबईतील प्रमुख गणेशोत्सवांचा ५०० कोटींचा विमा
By Admin | Updated: September 5, 2016 05:13 IST2016-09-05T05:13:20+5:302016-09-05T05:13:20+5:30
दरवर्षी गणेशोत्सवाला वाढत जाणारी गर्दी आणि त्या अनुषंगाने उद््भवू शकणारे धोके लक्षात घेऊन या उत्सवांना विमा कवचाने सुरक्षित करण्याचा नवा कल

मुंबईतील प्रमुख गणेशोत्सवांचा ५०० कोटींचा विमा
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवाला वाढत जाणारी गर्दी आणि त्या अनुषंगाने उद््भवू शकणारे धोके लक्षात घेऊन या उत्सवांना विमा कवचाने सुरक्षित करण्याचा नवा कल दिसून येत असून, मुंबईतील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिळून यंदा ५०० कोटींचा विमा उतरविला असल्याची माहिती मिळते.
प्रसिद्ध देवस्थाने व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणाऱ्या जत्रांखेरीज देशाच्या विविध भागांत लाखोंच्या सहभागाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दुर्गापूजा यांसारखे उत्सव डोळ्यांपुढे ठेवून सर्वसाधारण विमा कंपन्यांनी अनेक प्रकारचे धोके व अपघात एकत्रितपणे ‘कव्हर’ होतील, अशा खास विमा पॉलिसींची आखणी केली आहे. या उत्सव मंडळांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याने व अल्पावधीचा हा विमा तुलनेने कमी हप्त्यात उपलब्ध होत असल्याने उत्सवांचा विमा हळूहळू लोकप्रिय होत आहे.
विमा कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून तिचे विसर्जन होईपर्यंत ही विमा पॉलिसी लागू असते. यात मूर्ती, तिचे दागिने, सजावट, मंडप, रोशणाई, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचा निरनिराळ्या रकमेचा विमा उतरविता येतो. शिवाय उत्सवांच्या ठिकाणी काही घात-अपघात होऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची जीवितहानी झाली किंवा परिसरातील मालमत्तेची हानी झाली तर त्यांना द्यायच्या भरपाईचीही या विम्यात सोय असते. विसर्जनाच्या वेळी दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांनाही उत्सव मंडळे या विम्यातून भरपाई देऊ शकतात. यातील प्रत्येक गोष्ट व घटना यासाठी किती रकमेचा विमा हवा हे मंडळ ठरवू शकते व त्या प्रत्येकासाठी प्रीमियमचा निरनिराळा दर असतो. सर्वाचे एक पॅकेज करून पॉलिसीचा एकरकमी प्रीमियम ठरविला जातो. रीतसर नोंदणी झालेल्या मंडळांनाच हा विमा परतविता येतो. या प्रीमियमचा दर एक लाखाच्या विम्यासाठी तीन हजार रुपयांपासून दोन कोटींच्या विम्यासाठी २.५ लाख रुपयांपर्यंत आणि त्याच्या पटीत असू शकतो. (विशेष प्रतिनिधी)