झोपडपट्ट्यांमध्ये सुरू होणार ५० वस्ती क्लिनिक
By Admin | Updated: August 17, 2016 01:25 IST2016-08-17T01:25:28+5:302016-08-17T01:25:28+5:30
महापालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ४ क्लिनिकची सुरुवात करण्यात आली असून

झोपडपट्ट्यांमध्ये सुरू होणार ५० वस्ती क्लिनिक
पुणे : महापालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ४ क्लिनिकची सुरुवात करण्यात आली असून, येत्या महिनाभरात ५० क्लिनिक सुरू होणार आहेत. यामध्ये महापालिकेचे डॉक्टर नागरिकांच्या घरांपर्यंत पोहचून त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेणार आहे, त्याचबरोबर छोट्या आजारांवर औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दिल्ली महापालिकेच्या वतीने वस्ती क्लिनिकचा प्रयोग राबविला असून याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने झोपडपट््यांमध्ये वस्ती क्लिनिक योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्ट पासून मंगळवार पेठ, येरवडा भागांमध्ये ४ वस्ती क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
महापालिकेची समाजमंदिर, सभागृह, आरोग्य कोठी ठिकठिकाणी वस्तीपातळीवर आहेत. तिथेच हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेचे डॉक्टर आठवड्यातील ३ दिवस उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांना तपासून त्यांना तिथे औषधेही दिली जाणार आहेत. महापालिकेची शहरात ६२ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमधील डॉक्टरच नागरिकांसाठी वस्ती क्लिनिकमध्ये उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांच्या घरापर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य विषयक प्रश्न समजण्यास महापालिका प्रशासनाला मदत होणार आहे.
छोट्या आजारांवर तिथल्या
तिथे लगेच औषधे दिली जाणार आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या
साथी पसरू नयेत याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठीही या वस्ती क्लिनिकची मोठी मदत
होणार आहे. शहरातील ससून रुग्णालय, औंध सर्वोपचार रुग्णालय येथे किरकोळ आजाराच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वस्ती पातळीवर क्लिनिक सुरू झाल्यामुळे ही गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती क्लिनिकमुळे पुन्हा रुग्ण पालिकेच्या दवाखान्यांकडे वळू शकतील. खासगी हॉस्पिटलकडून साध्या तपासणीसाठी २०० रुपयांपासून ते १ हजार रूपयांमध्ये शुल्क आकारले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब रुग्णांसाठी वस्ती क्लिनिकची योजना फायदेशीर ठरणार आहे.