पॉलिटेक्निकच्या ५० टक्के जागा रिक्त राहणार
By Admin | Updated: June 30, 2015 03:10 IST2015-06-30T03:10:56+5:302015-06-30T03:10:56+5:30
राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत.

पॉलिटेक्निकच्या ५० टक्के जागा रिक्त राहणार
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा एकूण संस्थांमधील सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविकेच्या आॅनलाइन प्रक्रियेस १६ जूनपासून सुरुवात झाली. शनिवारपर्यंत केवळ ५० हजार प्रवेश अर्ज दाखल झाल्याने संस्थांचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेवटच्या दोन दिवसांत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने किमान ५० टक्के जागा तरी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे सोयीचे ठरणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने संस्थाचालकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बड्या संख्येने संस्था बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण गेल्या वर्षीही ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.
प्रवेश अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास २ ते ४ जुलैदरम्यान अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) मार्गदर्शन केले जाईल. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल.
संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कॅप राउंडनुसार प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १७ जुलैदरम्यान आॅनलाइन प्रवेशासाठी पसंतीक्रम निश्चित करावे लागतील. या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २० जुलैला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तर दुसऱ्या कॅप राउंडप्रमाणे २१ ते २४ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. समुपदेशनाची फेरी १० ते १४ आॅगस्टदरम्यान पार पडेल. त्या माध्यमातून रिक्त झालेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, तर ३ आॅगस्टपासून कॉलेजेसला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)