५0 लाखांत फोडला पेपर!
By Admin | Updated: March 1, 2017 05:42 IST2017-03-01T05:42:26+5:302017-03-01T05:42:26+5:30
देशभरातील ५२ केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांमध्ये फोडण्यात आली

५0 लाखांत फोडला पेपर!
ठाणे : देशभरातील ५२ केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांमध्ये फोडण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सशस्त्र दलाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. ठाणे पोलिसांनी एकाच वेळी पुणे, नागपूर आणि गोव्यात धाड टाकून या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रविवारी केला होता. या प्रकरणी सैन्याच्या ४ आजी-माजी कर्मचाऱ्यांसह २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सैन्य भरतीची तयारी करून घेणाऱ्या वेगवेगळ्या क्लासेसच्या ५ संचालकांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. परीक्षार्थींपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचविण्याच्या गुन्ह्यात या संचालकांचाही मोठा सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. परंतु, या संचालकांपर्यंत प्रश्नपत्रिका कुणी पोहोचवल्या या मुख्य प्रश्नाची उकल अद्याप व्हायची आहे. प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांत फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, ती दिल्ली येथील सैन्य भरती मंडळाचे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) कार्यालयातून फुटली, प्रश्नपत्रिकांची छपाई करणाऱ्या छापखान्यातून फुटली की आणखी कुठून, याबाबत पोलिसांना सध्या तरी ठोस माहिती मिळालेली नाही. सध्या अटकेत असलेल्या सैन्याच्या ज्या कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका सर्वांना पुरवल्या, त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली होती. सध्या अज्ञात असलेल्या या आरोपीने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न कोऱ्या कागदावर लिहिले होते. कोऱ्या कागदावर प्रश्न उतरवताना प्रश्नांचा क्रम त्याने बदलवला होता. स्वहस्ताक्षरात लिहिलेला हा पेपर त्याने ५0 लाख रुपयांत फोडला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
५0 लाख रुपयांत मिळालेल्या या प्रश्नपत्रिकेच्या आधारे कोट्यवधी रुपये कमविण्याचा कट टोळीने रचला होता. प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात प्रत्येक परीक्षार्थीकडून साधारणत: ३ ते ४ लाख रुपये ते घेणार होते. परीक्षार्थी जास्त असले तर कमी रक्कम घेण्याची त्यांची योजना होती. ठाणे पोलिसांनी हा कट उधळल्यामुळे ही टोळी गजाआड झाली असली तरी त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बरेच अडथळे पार करावे लागणार आहेत. या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे आरोपी सैन्याशी संबंधितही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासामध्ये सैन्याकडून कसे सहकार्य मिळते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
>सैन्याच्या गुप्तचर शाखेशी संपर्क
सैन्य भरती घोटाळ्यातील आणखी काही आरोपी सैन्याशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी सैन्याशी नियमित संवाद ठेवला आहे. पोलीस यंत्रणेने सैन्य भरती मंडळाच्या संचालकांसह सैन्याच्या गुप्तचर शाखेशीही तपासकामी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
>विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
पोलिसांनी रविवारी टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्रातून ३0५ तर गोवा येथून ४५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. छाप्यावेळी या प्रकरणातील आरोपींसोबत विद्यार्थीही सापडल्याने त्यांचीही भूमिका लवकरच तपासली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.