पश्चिम उपनगरांतील बिल्डरकडे ५० लाखांची खंडणी
By Admin | Updated: July 22, 2016 03:21 IST2016-07-22T03:21:11+5:302016-07-22T03:21:11+5:30
बांधकाम व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी देण्यासाठी वारंवार धमकाविणाऱ्या दोघा तरुणांना खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली

पश्चिम उपनगरांतील बिल्डरकडे ५० लाखांची खंडणी
मुंबई: पश्चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी देण्यासाठी वारंवार धमकाविणाऱ्या दोघा तरुणांना खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. हर्षल मनोहर आग्रे (वय २७) आणि सुमीत सत्यनारायण पालमपुरा (२०, दोघे रा. सांताक्रुझ पश्चिम) अशी त्यांची नावे आहे. आग्रे हा कुरियर बॉयचे काम करत असून दोन वर्षांपूर्वी बिल्डरकडे आॅफिस बॉय म्हणून कामाला होता. पैशांची गरज असल्याने त्याने खंडणीचा डाव रचला होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कांदिवली परिसरातील एका प्रतिष्ठित बिल्डरची पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात त्यांना एक कॉल आला. आपले नाव छोटे सांगून ‘५० लाख दे, नाहीतर ठार मारू’, असे त्याने धमकावले. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना वारंवार वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमक्या दिल्या. त्यामुळे बिल्डरने त्याबाबत खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला. विलेपार्ले येथील नेहरू रोडवरील एका हॉटेलजवळ त्याला बोलविण्यात आले. बिल्डरकडून पैसे स्वीकारत असताना त्यांना दोघांना अटक करण्यात आली.
मनोहर आग्रे हा कुरियर बॉयचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी तो बिल्डरकडे कामाला होता. मात्र त्यानंतर नोकरी सोडून एका कुरियर कंपनीत कामाला लागला. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न झाल्यानंतर तो वर्सोवा येथे स्वतंत्र राहू लागल्यानंतर खर्चाला पैसे कमी पडू लागले. त्यामुळे त्याने पालमपुराला सोबत घेवून बिल्डरकडे पैसे मागण्याचा फ्लॅन आखला. त्यांच्या कामाची पद्धत व अन्य सर्व बाबी कुटुंबीयांना माहित होत्या. त्यानुसार दोघे त्यांना पैशांसाठी फोन करत होते. मनोहरचा साथीदार सुमीत हा शिक्षण घेत असून त्याला झटपट पैसे मिळविण्याचे अमीष दाखवित त्याने कटात सामील करून घेतले होते. (प्रतिनिधी)