पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा
By Admin | Updated: March 1, 2017 03:50 IST2017-03-01T03:50:11+5:302017-03-01T03:50:11+5:30
प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल

पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा
ठाणे : महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प लेखाजोखा स्वरूपात न राहता त्यात विविध प्रस्तावांची मांडणी करताना त्या प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल, अशी नवी मांडणी माहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जयस्वाल हे शहराचा पुढील ५ वर्षांचा व्हिजन आराखडा सादर करून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहेत.
महापालिकेचा हा आराखडा प्रत्येक प्रभागनिहाय असेल. प्रत्येक विभागाने अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित प्रकल्पांची मांडणी करताना त्या प्रस्तावाचा कालावधी ५ वर्षांपेक्षा कमी असू नये तसेच त्या ५ वर्षांमध्ये संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने काय पावले उचलण्यात येणार आहेत, त्याचे आर्थिक नियोजन कसे असणार आहे याची संपूर्ण मांडणी प्रस्तावातच करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. या व्हिजन प्लॅनची आखणी जशी मुख्यालयस्तरावर होणार आहे तशीच ती प्रभागस्तरावर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित प्रभागांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांना एकत्रितपणे हा आराखडा तयार करावा असे त्यांनी सूचित केले आहे.
या आराखड्यात रस्ते, भांडवली कामे आदींचाच समावेश न करता खासगी लोकसहभागातून काय कामे करता येतील, ५ वर्षांत उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्यासाठी काय धोरण आखण्याची गरज आहे आदी सर्व बाबींचा तपशील व आवश्यक आर्थिक तरतुदींची गरज याचा गोषवारा नमूद करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)
>अहवाल सादर करण्याचे विभागांना आदेश
या संदर्भात आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर ते स्वत: विभागनिहाय सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची उपयुक्तता तपासून अंतिम निर्णय घेणार आहेत.
प्रत्येक विभागाने सादर केलेल्या आराखड्यानंतर त्यातील व्यवहार्य आणि योग्य कल्पना उचलून त्या आधारे शहराचा अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करून त्याची रचना केली जाणार असल्याने त्याचा ठाण्याच्या विकासाला फायदा होईल.