राज्यपालांना धक्काबुक्की करणारे काँग्रेसचे ५ आमदार निलंबित
By Admin | Updated: November 12, 2014 18:50 IST2014-11-12T18:21:02+5:302014-11-12T18:50:13+5:30
राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्यपालांना धक्काबुक्की करणारे काँग्रेसचे ५ आमदार निलंबित
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, जयकुमार गोरे आणि विरेंद्र जगताप अशी या पाच निलंबित आमदारांची नाव आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव बुधवारी विधीमंडळात अभिभाषणासाठी आले होते. सकाळी विश्वासदर्शक ठरावात घटनेची पायमल्ली झाल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला होता. राज्यपालांनी विधीमंडळात अभिभाषणासाठी येऊ नये अशी मागणी करणारे पत्रही काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. मात्र दुपारी राज्यपाल विद्यासागर राव विधीमंडळात आले असता शिवसेना व काँग्रेस आमदारांनी त्यांची गाडी रोखून ठेवली. तसेच राज्यपाल विधीमंडळात प्रवेश करत असतानाही काँग्रेस आमदारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळात राज्यपालांच्या हाताला किरकोळ इजा झाली व राज्यपालांच्या ताफ्यातील एका अधिका-याला किरकोळ दुखापत झाल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेस आमदारांच्या या कृतीविरोधात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान सभेत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी झालेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली होती. मात्र राज्यपालांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. अखेरीस या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.