कापसासाठी ‘५ एफ’ फॉर्म्यूला!

By Admin | Updated: October 7, 2014 23:30 IST2014-10-07T23:25:58+5:302014-10-07T23:30:42+5:30

घोटाळेबाज महाराष्ट्राला कुशल महाराष्ट्र बनविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खामगाव येथे ग्वाही.

'5 F' formula for cotton! | कापसासाठी ‘५ एफ’ फॉर्म्यूला!

कापसासाठी ‘५ एफ’ फॉर्म्यूला!

खामगाव (बुलडाणा) : विदर्भ ही कापसाची भूमी असल्याचे सांगत, येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५ -एफ फॉम्र्यूला जाहीर केला. हा फॉम्र्यूला वापरून घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या राज्याचे कुशल महाराष्ट्रात रूपांतर करण्याची ग्वाही त्यांनी खामगाव येथील जाहीर सभेत दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा आर्थिक विकास करायचा असेल, तर फार्म (शेती), फायबर (धागा), फॅब्रिक्स (कापड) , फॅशन (रेडीमेड गारमेंट) आणि फॉरेन (निर्यात) हा ५-एफ फॉर्म्यूला राबविणे आवश्यक आहे. जिथे कापूस उत्पादन होते तिथेच धागा बनावा, तिथेच कापड बनावे, त्या कापडापासून रेडीमेड कपडे तयार व्हावे आणि तयार झालेला माल इथूनच विदेशात जावा. या प्रक्रियेत शेतकर्‍यांपासून कारागिरापर्यंत, लहान-मोठय़ा व्यावसायिकांपासून तर व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच उत्पादन मिळेल. भाजप स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेत आले, तर हे स्वप्न निश्‍चित पूर्ण करू, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गत पंधरा वर्षे महाराष्ट्रात कुशासन होते. दरवर्षी नवीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यांमुळे युवा पिढीचे भविष्य उध्वस्त झाले. भाजपच्या हाती सत्ता आली, तर युवकांना नव्या संधी देणारा स्कील्ड महाराष्ट्र उभा करु, असेही ते म्हणाले. रेल्वे, सिंचन, कृषी या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी खास तरतूद केली असून, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. आजही महाराष्ट्रातील अनेक गावं भारनियमनामुळे १५ ते १८ तास अंधारात असतात, हे आश्‍चर्यच आहे; मात्र येणार्‍या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त असेल. आघाडी सरकारने १५ वर्षे पाप केले. त्यामुळे १५ ऑक्टोबर रोजी या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार भाऊसाहेब फुंडकर, खा.संजय धोत्रे, भाजपाचे उमदेवार डॉ. संजय कुटे, अँड. आकाश फुं डकर, योगेंद्र गोडे, सुरेशअप्पा खबुतरे, नरहरी गवई, चैनसुख संचेती, प्रकाश भारसाकळे, डॉ. गणेश मांटे, आ. गोवर्धन शर्मा, आ. डॉ. रणजित पाटील, हरिष पिंपळे आदी उपस्थित होते.

** आघाडी, युतीचे राज्य संपवा
आघाडी आणि युतीच्या कारभारात एकमेकांवर जबाबदार्‍या ढकलण्याचे प्रकार होतात. स्पष्ट बहुमताची सत्ता असली, तर त्या सरकारचा कान पकडता येतो, असे स्पष्ट करून, पाच वर्षानंतर मी माझ्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडेन, असे आश्‍वासन मोदी यांनी दिले.

Web Title: '5 F' formula for cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.