पुणे : राज्यातील बेरोजगारांची एकूण अधिकृत संख्या ४५ लाख १ हजार ४२६ इतकी आहे. काँग्रेस प्रणित एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला सरकारी कार्यालयाने दिलेल्या उत्तरातून ही संख्या उघड झाली. याशिवाय नोंदणी न झालेले आणखी काही लाख बेरोजगार असतील ते वेगळेच!एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख यांनी ही माहिती दिली. माहितीच्या अधिकारात त्यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज केला होता. त्यात त्यांनी राज्यातील नोंदणीकृत बेरोजगारांच्या संख्येची मागणी केली होती. त्याप्रमाणे या सरकारी विभागाने त्यांना बेरोजगारांची संख्या ४५ लाख असल्याचे कळवले आहे.शेख म्हणाले, ही परिस्थिती भयावह आहे. यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या संख्येने बेरोजगार नव्हते. यात भर म्हणून लाखो लोकांच्या असलेल्या नोकऱ्या जात आहेत. या बेरोजगारीच्या विरोधात सरकार काहीही पावले उचलायला तयार नाही. वास्तविक नोंदणी झालेल्यांना नोकऱ्या मिळवून देणे, त्यासाठी विविध क्षेत्रांबरोबर सतत संपर्कात राहणे ही संबधित खात्याची जबाबदारी आहे.मात्र ते ही जबाबदारी पार पाडत नाहीत. रोजगार हा प्रत्येकाचा हक्क आहे व सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे. नवे उद्योग यावेत, त्यातून नोकऱ्या निर्माण व्हाव्यात यासाठी सरकार काहीच करायला तयार नाही. हे असेच सुरू राहिले तर येत्या काही वर्षात सर्वसामान्यांचे जगणे अवघड होईल. त्यामुळे युवकांच्या या प्रश्नाची दखल घेत एनएसआय सरकारच्या विरोधात युवकांचे संघटन उभे करेल. सध्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना एक आंदोलनक करेल असा इशाराही शेख यांनी दिला.
राज्यात ४५ लाख बेरोजगार : माहिती अधिकारात उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:20 IST
याशिवाय नोंदणी न झालेले आणखी काही लाख बेरोजगार असतील ते वेगळेच!
राज्यात ४५ लाख बेरोजगार : माहिती अधिकारात उघड
ठळक मुद्देएनएसयुआय करणार आंदोलन