टपाल कार्यालयांत ४३५ कोटी जमा
By Admin | Updated: November 13, 2016 03:55 IST2016-11-13T03:55:28+5:302016-11-13T03:55:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली.

टपाल कार्यालयांत ४३५ कोटी जमा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली. १० नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील टपाल कार्यालयांत ४३५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पोस्ट मास्तर जनरल यांनी दिली.
व्यवहारातून रद्द करण्यात आलेल्या १००० व ५०० नोटा बँकेव्यतिरिक्त टपाल कार्यालयांतूनही बदलून मिळतील, असे मोंदींनी जाहीर केल्यावर, लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकेबरोबरच टपाल कार्यालयांबाहेरही रांगा लावल्या. पुरेसे सुटे पैसे उपलब्ध नसल्याने, पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांतील टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मात्र, १० नोव्हेंबरपासून टपाल कार्यालयांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली.
‘१० नोव्हेंबरला टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा बचतखात्यात जमा करून घेतल्या, तसेच टपाल कार्यालयांत खाते नसलेल्यांना नोटा बदलूनही दिल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकूण २०५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा राज्यातील टपाल कार्यालयांत जमा झाल्या, तर शुक्रवारी २३० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा टपाल कार्यालयांत जमा करण्यात आल्या,’ असे महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पीएमजी एच. सी. अग्रवाल यांनी सांगितले. टपाल विभागाने गुंतवणुकीच्या योजना लोकांना समजावून दिल्या, त्यांना लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘आमच्या योजनांमध्ये अनेक लोकांनी रस दाखवला. टपाल कार्यालयांत बचतखाते सुरू करण्यासाठी व अन्य योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेकांनी फॉर्म नेले आहेत,’ असेही अग्रवाल यांनी म्हटले.(प्रतिनिधी)