यवतमाळ बसस्थानकात ४१ लाख जप्त
By Admin | Updated: January 30, 2015 00:48 IST2015-01-30T00:48:49+5:302015-01-30T00:48:49+5:30
एसटी बसमधून उतरलेला एक तरुण हातात दोन बॅग घेऊन सैरभैर वागताना दिसला. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस शिपायाला संशय आला. त्याने बॅगची झडती घेतली.

यवतमाळ बसस्थानकात ४१ लाख जप्त
यवतमाळ : एसटी बसमधून उतरलेला एक तरुण हातात दोन बॅग घेऊन सैरभैर वागताना दिसला. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस शिपायाला संशय आला. त्याने बॅगची झडती घेतली. त्यामध्ये तब्बल ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची बेहिशेबी रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली.
जप्त करण्यात आलेली रोकड ‘हवाला’ची असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही कारवाई येथील बसस्थानकात बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
जिग्नेश रसिकभाई पटेल (२१) रा. ग्रीनपार्क सोसायटी मैसान (गुजरात) ह.मु. रायली प्लॉट अमरावती असे रोकडसह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री तो अमरावती-यवतमाळ बसमधून उतरला.
यावेळी त्याच्या हातात दोन बॅग होत्या. त्याचे ओझेही त्याला सांभाळणे कठीण झाले होते. या स्थितीत तो सैरभैर अवस्थेत दिसला. त्यामुळे बॅगमध्ये अवैध दारू तर नाही ना, असा संशय तेथील पोलीस शिपाई केशव आदेवार यांना आला. त्याची चौकशी केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला. शिपाई आदेवार यांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी दोनही बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांंचे अनेक बंडल आढळून आले. त्यांनी ही माहिती वडगाव रोडचे फौजदार संतोष केंद्रे यांना दिली. त्यांनी तत्काळ बसस्थानक गाठून रोखेसह त्या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र ही रक्कम कोठून आणली, ती यवतमाळात कशासाठी आणली, अशा विविध प्रश्नांची उत्तरे संशयित जिग्नेश देऊ शकला नाही. त्यामुळे ही रक्कम ‘हवाला’ची असावी, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले.
त्यावरून रोकड जप्त करून संशयित जिग्नेश पटेल याच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (१) (अ) (ड) आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
म्हणे, रोकड प्लॉटच्या व्यवहाराची !
संशयित जिग्नेश पटेल याने ही रक्कम तीन भागीदार मिळून असलेल्या अमरावतीच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे सांगितले. त्यांनी यवतमाळ येथे एक प्लॉट खरेदी केला आहे. त्याच्याच व्यवहाराची ही रक्कम पोहोचती करण्यासाठी आपण एसटी बसद्वारे आल्याचे पोलिसांपुढे उघड केले. लाखोंचा व्यवहार आणि ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची रोकड एखाद्या तरुणाच्या हाताने, तीही एसटी बसमधून पाठविण्याचा धोका कुणीही पत्करणार नाही, असा पोलिसांचा कयास आहे.