४00 लग्नातून बॅण्डबाजा, फटाके, घोडा हद्दपार!
By Admin | Updated: July 13, 2014 21:38 IST2014-07-13T20:24:44+5:302014-07-13T21:38:19+5:30
लाखो रुपयांची बचत: विदर्भ-खान्देशात बारी समाजाने उभा केला आदर्श
४00 लग्नातून बॅण्डबाजा, फटाके, घोडा हद्दपार!
जळगाव जामोद: लग्नामधून बॅण्डबाजा, फटाके व घोडा हद्दपार करण्याचा अनुसरणीय निर्णय घेत, विदर्भ व खान्देशातील बारी समाजाने उभ्या महाराष्ट्रापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. गेल्या लग्नसराईच्या हंगामात विदर्भ व खान्देशात, बारी समाजातील ३00 विवाह सोहळे या निर्णयाला अनुसरून पार पडले. बारी समाजाचा आदर्श समोर ठेवून इतर काही समाजातही सुमारे १00 विवाह याच पद्धतीने पार पडले. या क्रांतीकारी निर्णयामुळे अनेक कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आणि सोबतच परंपरागत अनिष्ट चालिरितींनाही फाटा मिळाला. बारी समाजाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. इतर काही समाजांनीही त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक ओबीसी परिषदेने माळी समाजातही हा निर्णय राबविण्याचा प्रयत्न केला. कुणबी, पाटील या मोठ्या समाजांसह काही लहान समाजांनीही या निर्णयाचे स्वागत केले; मात्र फार मोठय़ा प्रमाणात त्याचा अं गिकार झाला नाही. बारी समाजात मात्र या निर्णयाची चांगली अंमलबजावणी झाली. बारी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, अंजनगाव, अमरावती, यवतमाळ या भागांमधील बारी समाजबांधवांनी हा विचार स्वीकारला. खान्देशमध्ये वडोदा, कुर्हा, शेंदुर्णीसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, बारी समाजाने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाके हद्दपार करुन लग्ने लावली.
बारी समाजात ३00 पेक्षा जास्त लग्न या तत्वानुसार झाली, तर इतर काही समाजांमध्येही सुमारे १00 लग्ने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाक्यांना फाटा देत लागली. या निर्णयाचा अंगिकार करणार्या प्रत्येक वरपित्याची किमान ३0 ते ४0 हजार रुपयांची बचत झाली. त्याचबरोबर लग्न वेळेवर लागली, दारु पिऊन धिंगाणा घालणारे तरुण दिसले नाहीत आणि लग्नात मानपानासाठी वाद झाले नाहीत, तसेच रुसवे-फुगवे दिसले नाहीत. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणाला आळा बसला तो वेगळाच! या निर्णयाचे बिजारोपण झालेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर त्या दोन तालुक्यातच, पुढील लग्नसराईत या तत्वावर किमान १00 लग्न पार पडतील.
** २२ नवरदेवांचा सत्कार
या निर्णयाचा अंगीकार करुन बारी समाजातील यंदाच्या हंगामात लग्न झालेल्या २२ नवरदेवांचा, बारी समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू ठेवून, इतर समाजांपुढे आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.