ठाणे, कल्याणमध्ये ४०० सीसीटीव्ही
By Admin | Updated: December 30, 2015 01:00 IST2015-12-30T01:00:18+5:302015-12-30T01:00:18+5:30
शहर आयुक्तालयातील मोक्याच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला ठाणे शहर त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही लावण्याची

ठाणे, कल्याणमध्ये ४०० सीसीटीव्ही
- जितेंद्र कालेकर, ठाणे
शहर आयुक्तालयातील मोक्याच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला ठाणे शहर त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही लावण्याची योजना असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यासाठी १० ते २० कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो महापालिका आणि आमदार निधीतून करण्यात येणार आहे.
मुंबईचे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांचीही यासाठी लागणाऱ्या अभ्यासासाठी विशेष मदत घेण्यात येणार असून, परिमंडळ एकचे उपायुक्त सचिन पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची एक कमिटी महत्त्वाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करणार आहे.
महत्त्वाची ठिकाणे...
शहरातील मुंब्रा, कळवा, राबोडी, वागळे इस्टेट, येऊर, कोलशेत आणि उपवन परिसरात संवेदनशीलतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्याचे प्रयोजन आहे. शहरात विविध सोसायट्या आणि कंपन्यांनी आतापर्यंत १८०० सीसीटीव्ही लावले असून, त्यांचे अँगल्स आणि ठिकाणे बदलून नव्या ठिकाणी हे कॅमेरे लागतील, या दृष्टीनेही अभ्यास करण्यात येत आहे.
असे होणार सर्वेक्षण...
गुन्हेगारीच्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेचा यामध्ये विशेष विचार केला जाणार आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे, तसेच लुटमारीचे प्रकार जिथे होतात अशी ठिकाणे निवडण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालय, मार्केट आणि महामार्गांवर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या
दृष्टीने जातीय दंगलीची शक्यता असलेली ठिकाणे, मोर्चा, संवेदनशील ठिकाणे आणि दहशतवादाच्या दृष्टीने काही धार्मिक स्थळांचाही यामध्ये समावेश आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महामार्ग आणि महत्त्वाच्या चौकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. करंदीकर यांनी दिली.
खर्चाबाबत जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे काही निधी जिल्हा नियोजन समिती आणि काही निधी पालिकेच्या खर्चातून उपलब्ध होणार आहे.