पिंजर: बाश्रीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथे एका लग्नसोहळय़ानिमित्त १ जुलै रोजी सायंकाळी आयोजित नानमुखाच्या कार्यक्रमादरम्यान भोजनातून ४0 जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांना बुधवार २ जुलै रोजी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.जमकेश्वर येथील डिगांबर त्र्यंबक दांदळे यांचा मुलगा राजू दांदळे यांचा आज २ जुलै रोजी विवाह सोहळा आहे. त्या निमित्ताने १ जुलै रोजी सायंकाळी नानमुखाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित पाहुणे मंडळी व स्थानिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मात्र यापैकी काही लोकांना रात्री उशीरा उलट्या, मळमळ, चक्कर येणे सुरू झाले. गजानन माने, उल्हास दांदळे, वैष्णव दांदळे, अनिता चव्हाण, संदीप चव्हाण (येवता), साक्षी दांदळे, शालीग्राम देशमुख (कारंजा), पूनम देशमुख (शिराळा), शालुबाई देशमुख, कुलदीप देशमुख (अंजनगाव सुर्जी) यांच्यासह १५ जणांना विषबाधा झाल्याने त्यांना बुधवारी सकाळी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर आणखी २५ जणांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी एस. आर. ढोरे, डॉ. योगेश आकोत, अनिल वाघमारे, अशोक थोरात, नीता गुरव, अनुराधा सिरसाट आदींनी विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू केले. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून, त्यांना लवकरच सुटी देण्यात येणार असल्याचे डॉ. ढोरे यांनी सांगितले.
लग्नसोहळय़ात ४0 जणांना विषबाधा
By admin | Updated: July 3, 2014 01:40 IST