मुंबईत दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी
By Admin | Updated: August 18, 2014 17:33 IST2014-08-18T14:45:48+5:302014-08-18T17:33:12+5:30
मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ४० गोविंदा जखमी झाले आहे.
मुंबईत दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ४० गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बोल बजरंग बली की जय असे म्हणत ढाक्कूमाक्कूमच्या तालावर मुंबई, ठाण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. सुप्रीम कोर्टाने निर्बंध हटवल्यामुळे गोविंदा पथकांमधील थरांची स्पर्धा यंदाही कायम असून आयोजकही गोविंदा पथकांना लाखो रुपयांचे आमीष दाखवत त्यांना आकर्षित करत आहेत. मात्र थरांची ही स्पर्धा गोविंदा पथकांसाठी पुन्हा एकदा वेदनदायीच ठरली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी थरांवरुन कोसळून आत्तापर्यंत ४० गोविंदा जखमी झाले आहेत. यातील ३१ गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी २८ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. तर उर्वरित तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायरमध्ये सहा आणि सायनमध्ये एक जखमी गोविंदाला दाखल करण्यात आले होते. किरकोळ दुखापत असल्याने त्यांना उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आले.
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी सालाबादप्रमाणे यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या दहीहंडीमध्ये स्पेनहून आलेल्या तरुणांनी सात थरांची सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली. तर आ. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने साधेपणाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
घाटकोपरमध्ये राम कदम यांनी तर वरळीत सचिन आहीर यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडीमध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी हजेरी लावत आहे. सुप्रीम कोर्टाने सेफ्टी बेल्टचा वापर करणे, आयोजनस्थळी मऊ गाद्यांवर दहीहंडीसाठी थर लावणे बंधनकारक केले आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी हे नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची दहीहंडी याला अपवाद ठरली आहे. विचारे यांनी आयोजनठिकाणी मॅट उपलब्ध करुन दिली आहे. १२ वर्षांखालील बाल गोविंदाना थरावर चढण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यावर पोलिस करडी नजर ठेवून आहेत.