४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला चिमुकला बचावला
By Admin | Updated: February 2, 2015 01:08 IST2015-02-02T01:08:58+5:302015-02-02T01:08:58+5:30
बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यात आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला तब्बल १२ तासांच्या परिश्रमाने यश आले. सहा इंच व्यास असलेल्या बोअरवेलमध्ये

४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला चिमुकला बचावला
१२ तास बचाव अभियान : आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला यश
फुलसावंगी (यवतमाळ) : बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यात आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला तब्बल १२ तासांच्या परिश्रमाने यश आले. सहा इंच व्यास असलेल्या बोअरवेलमध्ये ४० फूट खोल अडकलेल्या चिमुकल्याने बाहेर काढल्यानंतर आई म्हणून दिलेली हाक अनेकांच्या हृदयाला छेदून गेली.
उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील शेतातील बोअरवेलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता सुरज शंकर आखरे हा चिमुकला पडला होता. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबीच्या मदतीने बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला.
आपत्ती प्रक्रिया दलाच्या जवानांनी महत्प्रयासाने खड्डा आणि बोअरवेलदरम्यान भुयार खोदले. या भुयारातून रात्री २.३० वाजताच्या सुमारास सुरजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तत्काळ त्याला फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बचाव कार्यासाठी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार डॉ. सचिन शेजाळ तळ ठोकून होते. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदल्यानंतर आपत्ती प्रक्रिया दलाचे हरिचंद्र राठोड, पृथ्वीराज चव्हाण, अभिषेक राजहंस, तनय कोथळे, धीरज राऊत, प्रतीक काळसर्पे, रोशन राठोड आणि अकोला येथील अजिंक्य ग्रुपच्या चार जवानांनी सबलीच्या साहाय्याने भुयार खोदून सुरजला बाहेर काढले.
त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. आईच्या चेहऱ्यावर चिमुकला सुखरूप बाहेर आल्याचा आनंद अश्रुवाटे मोकळा होत होता. सुरजपुढे नियती हरली असाच काहीसा प्रत्यय आला. सुरज बोअरवेलमध्ये पडला तेव्हापासून त्याला सुखरूप बाहेर काढेपर्यंत पंचक्रोशीतील हजारो नागरिक तळ ठोकून बसले होते. (प्रतिनिधी)