३७ हजारांपैकी बियाण्यांचे ४ हजार ८४७ नमुने ‘नापास’
By Admin | Updated: July 31, 2014 01:00 IST2014-07-31T01:00:40+5:302014-07-31T01:00:40+5:30
पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी

३७ हजारांपैकी बियाण्यांचे ४ हजार ८४७ नमुने ‘नापास’
बियाण्यांची तपासणी : राज्यात पुणे, परभणी व नागपूर येथे प्रयोगशाळा
प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)
पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी करून घेतली़ पैकी ४ हजार ८४७ बियाण्यांचे नमुने ‘नापास’ झाले आहेत़ नापास बियाण्यांची टक्केवारी १२.८४ टक्के आहे.
शेतकऱ्यांकडील बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत संशय असल्यास तपासणी करून घेता येते़ यातून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो़ बियाण्यांची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने पुणे, परभणी व नागपूर येथे स्वतंत्र बियाणे तपासणी प्रयोगशाळा उभारली आहे. दरवर्षी सुमारे ४८ हजार नमूने तपासले जातील, एवढी प्रयोगशाळांची क्षमता आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच विविध बियाणे कंपन्या, कृषी संस्था खरीप, रबी व उन्हाळी हंगामात विविध वाणांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतात़ यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी, भूईमुग, तूर, उडीद, कापूस, भात तसेच इतर भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतली जाते़ यामुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत चिंता राहत नाही़ पेरणीनंतर बियाणे उगविले नाही तर काय, ही भिती दूर होऊन संभाव्य धोका टाळता येतो.
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बियाण्यांची योग्यवेळी चाचणी करून घेतली तर उगवण क्षमतेबाबत साशंकता राहत नाही. यामुळे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरता येतात. जे बियाणे चाचणीअंती नापास झाले, तेच बियाणे चाचणी न करता लावले गेले तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो. प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री झाल्यावर भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करता येते़ शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेचा आधार घेऊन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी करून घेणे निश्चितच फायद्याचे आहे.