४ किलो सोन्याची तस्करी पकडली
By Admin | Updated: March 14, 2015 05:45 IST2015-03-14T05:45:28+5:302015-03-14T05:45:28+5:30
जेट एअरवेजच्या विमानातून मुंबई विमानतळावर आलेले ९५ लाखांचे सोने आणि ११ लाखांचे हिरे कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने (एआययू) हस्तगत केले.

४ किलो सोन्याची तस्करी पकडली
मुंबई : जेट एअरवेजच्या विमानातून मुंबई विमानतळावर आलेले ९५ लाखांचे सोने आणि ११ लाखांचे हिरे कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने (एआययू) हस्तगत केले. अटेंडन्ट अब्दुल हाफीज खत्री याने हे सोने विमानात दडविले होते. पुढे तो हे सोने सुरक्षितपणे विमानतळाबाहेर काढणार होता. एआययूने खत्री आणि विमानतळावर हे सोने न्यायला आलेल्या महोम्मद अफझल कुरेशी अशा दोघांना अटक केली आहे.
दुबईहून मुंबईला निघालेल्या जेट एअरवेजच्या ९डब्ल्यू-५४३ विमानातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणार आहे, अशी गुप्त माहिती एआययू अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार हे विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एआययू अधिकाऱ्यांनी विमान आणि विमानातील कामगारांची झडती घेतली. तेव्हा खत्रीकडून ४ किलो सोने आणि १४५ कॅरेटचे हिरे हस्तगत करण्यात आले.
चौकशीत त्याने हे सोने विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्याकडे दिले होते. तसेच मुंबई विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या कुरेशीच्या ताब्यात देण्यास सांगितले होते, अशी माहिती एआययू अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार कुरेशीलाही अटक करण्यात आली. ज्या प्रवाशाने हे सोने खत्रीकडे दिले त्याचा शोध एआययूकडून सुरू आहे. दोघांनी याआधीही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिल्याचे एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तसेच केनियाहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या सागर दवे आणि रसिकलाल या दोन भारतीय प्रवाशांकडून एआययूने तब्बल ३ किलो सोने हस्तगत केले. या सोन्याची किंमत ७४ लाख रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे एआययूने सांगितले.