संगणक टायपिंग परीक्षेसाठी ४ ग्रेस गुण
By Admin | Updated: April 4, 2017 03:12 IST2017-04-04T03:12:50+5:302017-04-04T03:12:50+5:30
संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला.

संगणक टायपिंग परीक्षेसाठी ४ ग्रेस गुण
हुसेन मेमन,
जव्हार- राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला. त्यामुळे परीक्षेचा निकाल वाढणार असून विद्यार्थी व संस्थाचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
शासन मान्यताप्राप्त वाणिज्य शिक्षण संस्थांत संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या गुणदान योजनेत ग्रेस गुणांची तरतूद केलेली नव्हती. मात्र परीक्षा परिषदेच्याच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेच्या विभाग १ मध्ये ५ ग्रेस गुणांची तरतूद आहे. मागील वर्षी एप्रिल २०१६ मध्ये प्रथमच शासकीय संगणक टायपिंगच्या इंग्रजी, हिंदी व मराठी ३० शब्द प्रति मिनिट या गतीची परीक्षा झाली. मात्र, या परीक्षेचा निकाल खूप कमी लागला होता. यानंतर राज्यातील विविध संस्था व संघटनांनी वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेप्रमाणेच संगणक टायपिंग परीक्षेसही ग्रेस गुण देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन २८ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रान्वये जीसीसी टीबीसी ३० शप्रमिसाठी ग्रेस गुणांची तरतूद केलेली आहे. यानुसार शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र (जीसीसी टीबीसी) ४० शब्द प्रति मिनिट व स्पेशल कोर्स इन कॉम्प्यूटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अॅण्ड स्टुडंट्स (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) या परीक्षेसाठी ग्रेस गुणांची तरतूद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन शासनमान्यता संस्थांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती. हे ग्रेस गुण देण्याबाबत परीक्षा परिषदेच्या कार्यकारी समितीने ठराव पारित करून शासनाकडे पाठविला होता.
त्यानुसार शासनाने जीसीसी टीबीसी ४० शप्रमि अभ्यासक्रमातील विभाग १.१ ते १.४ साठी एकत्रित २ व विभाग २ मधील अभ्यासक्रमासाठी २ याप्रमाणे ४ ग्रेस गुणांची तरतूद केली आहे.