३८ धार्मिक स्थळांवर होणार कारवाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 03:52 IST2017-03-02T03:52:42+5:302017-03-02T03:52:42+5:30
बेकायदा उभारलेल्या डोंबिवली एमआयडीसीच्या हद्दीतील ४३ धार्मिक स्थळांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या.

३८ धार्मिक स्थळांवर होणार कारवाई?
डोंबिवली : विकासकामांना अडथळे ठरणाऱ्या तसेच बेकायदा उभारलेल्या डोंबिवली एमआयडीसीच्या हद्दीतील ४३ धार्मिक स्थळांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी पाच धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली होती. त्यांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, उर्वरित ३८ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एमआयडीसीचे अधिकारी संजय ननावरे यांनी ही माहिती देत सांगितले की, यासंदर्भात महिनाभरापूर्वी संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात पाच धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी मागितली होती. त्यानुसार, संबंधितांची मंगळवारी सकाळपासूनच सुनावणी घेण्यात आली.
या वेळी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील अधिकारी तसेच धार्मिक स्थळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकली असून त्याचा अहवाल मुख्य कार्यालयाकडे दोन दिवसांत पाठवण्यात येणार असल्याचे ननावरे म्हणाले. त्यानंतर, त्यांच्या सूचनांनुसार या सर्व ४३ स्थळांवर काय कारवाई करायची की, ते सगळे कायम करायचे, याचा निर्णय घेण्यात येईल, असे ननावरे यांनी सांगितले.
दरम्यान, आताच त्यासंदर्भात काहीही सांगता येणार नाही. पण, तरीही सुनावणीला आलेल्या स्थळांबाबत विचार होऊ शकतो. अन्य स्थळांसंदर्भात कोणीही पुढे न आल्याने त्या स्थळांवर कारवाई का करू नये, असा पवित्राही ननावरे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)