अकरावीच्या पहिल्या यादीतून ३७ हजार प्रवेश

By Admin | Updated: July 1, 2016 01:40 IST2016-07-01T01:40:47+5:302016-07-01T01:40:47+5:30

आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतून ३७ हजार २०३ विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून प्रवेश निश्चित केले आहेत

37 thousand entries from the first list of eleventh | अकरावीच्या पहिल्या यादीतून ३७ हजार प्रवेश

अकरावीच्या पहिल्या यादीतून ३७ हजार प्रवेश


पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतून ३७ हजार २०३ विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून प्रवेश निश्चित केले आहेत; मात्र गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळूनही प्रवेश न घेतल्याने, १० हजार विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत; तसेच महाविद्यालयांकडे उपलब्ध असलेल्या विविध कोट्यातून ४ हजार ६५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे पहिल्या यादीतून तब्बल ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते. या विद्यार्थ्यांनी ३० जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात ५० रुपये शुल्क भरून प्रवेश घेणे आवश्यक होते. प्रवेश घेणारे विद्यार्थी
प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जातील, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते; तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या दिवशी २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी; तसेच तिसऱ्या दिवशी केवळ २९ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. गुरुवारी प्रवेशाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे अपेक्षित होते; मात्र १० हजार ३३१ विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रतिसाद दिला नाही. परिणामी आता हे विद्यार्थी
प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन
प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, एकही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने दिला जाणार नाही, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी आॅनलाइन
प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज केले; मात्र अर्जामध्ये चुकीचे पसंतीक्रम भरल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेऐवजी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला आहे; तसेच घराजवळील महाविद्यालयाऐवजी दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे; तसेच आॅनलाइन प्रवेशअर्ज भरायचा राहून गेला, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे विद्यार्थी व पालक घेऊन येत आहेत.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन सिस्टीममध्ये नोंदविणे कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक आहे. गुरुवारी प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही महाविद्यालयात उशिरापर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सर्व महाविद्यालयांची माहिती नोंदविली गेली नाही; मात्र त्यासाठी रात्री ११.३० पर्यंत प्रवेशाची लिंक सुरू ठेवली जाणार आहे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 37 thousand entries from the first list of eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.