25 लाख वीजग्राहकांना 36.94 कोटींचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 18:39 IST2016-07-12T18:39:06+5:302016-07-12T18:39:06+5:30
महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील 24 लाख 72 हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार 36 कोटी 94 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

25 लाख वीजग्राहकांना 36.94 कोटींचा परतावा
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील 24 लाख 72 हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार 36 कोटी 94 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. गेल्या एप्रिल ते जून महिन्यातील वीजदेयकांत ही रक्कम समायोजित करण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार 7.75 ते 8.50 टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार पुणे परिमंडलात आतापर्यंत लघुदाब वगर्वारीमध्ये लघुदाबमधील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी 24 लाख 72 हजार वीजग्राहकांना एकूण 36 कोटी 94 लाख 11 हजार रुपयांचे व्याज देयकांत समायोजित करण्यात आले आहे.
सर्व वगर्वारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येते. अद्यापही ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरलेली नाही त्यांनी सुरक्षा ठेव भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.