विभागात ३५२ टँकर सुरू
By Admin | Updated: April 30, 2016 01:41 IST2016-04-30T01:41:27+5:302016-04-30T01:41:27+5:30
उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा

विभागात ३५२ टँकर सुरू
पुणे : उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास टँकरची संख्या ५०० पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा विभागात सरासरी केवळ ७० ते ८० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तो आता खरा ठरत असून, एप्रिल महिन्यातच विभागात ३५२ टँकर सुरू असून, ३१२ गावे व तब्बल २ हजार १६३ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मेअखेरपर्यंत टँकरची संख्या ५००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सन २००३-०४मध्ये देखील विभागात गंभीर पाणीटंचाई होती. तीच परिस्थिती यंदा असल्याची चर्चा आहे. एका जत तालुक्यात सध्या ८० टँकर सुरू आहेत. तर माण, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथे टँकर भरण्याचे पाण्याच्या स्रोतदेखील आटले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
>विभागात सर्वाधिक १२६ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे १०१, सातारा १०३ आणि सोलापूर जिल्ह्यात २२ टँकर सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ८०, तासगाव १५, कवठेमहांकाळ ९, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५७, कोरेगाव १०, वाई ४, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ३४, इंदापूर २१, पुरंदर १६ आणि दौंड तालुक्यात २३ व जुन्नर तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत.