५८ जागांसाठी काँग्रेसकडून ३४६ इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 02:49 IST2017-01-21T02:49:58+5:302017-01-21T02:49:58+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे

346 interested in Congress for 58 seats | ५८ जागांसाठी काँग्रेसकडून ३४६ इच्छुक

५८ जागांसाठी काँग्रेसकडून ३४६ इच्छुक


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. श्रीमंत महापालिकेत आपले नशीब आजमविण्यासाठी अनेकांनी तयारी चालविली आहे. त्यातच काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी मुलाखती चालू केल्या आहेत. उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य मुंबईतील एकूण ५८ जागांसाठी तब्बल ३४६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
जिल्हा कमिटीनेच अर्ज आणि मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवार निवडावे, ज्या जागेवर वाद असतील केवळ अशाच प्रभागातील उमेदवारीचा निर्णय विभागीय काँग्रेस पातळीवर घेण्याचे धोरण यंदा मुंबई काँग्रेसने स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने सध्या काँग्रेसमध्ये मुलाखतींचा हंगाम सुरू झाला आहे. शिवाजी नगर येथील १३९ क्रमांकाच्या प्रभागासाठी सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात जिल्हाध्यक्ष वेलू स्वामी नायडू, मनपा विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांचे निकटवर्तीय भवरसिंह राजपुरोहित यांच्यासह १३ जणांचा समावेश आहे. तर, घाटकोपर पूर्वेतील १३२ क्रमांक प्रभागातून केवळ प्रवीण छेडा यांची एकट्याचीच दावेदारी आली आहे. घाटकोपर पश्चिमेतील शिवम् हॉलमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉन मुलाखतींना मोठ्या प्रमाणावर काँग्रेसजनांनी हजेरी लावली. मुलुंड पूर्वेला १०८ आणि १०३ क्रमांकांच्या प्रभागासाठीही मुलाखती झाल्या. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा-दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या. १३३ क्रमांकावरही दहा जणांनी दावा ठोकला होता. प्रत्यक्षात मुलाखतीसाठी मात्र सातच जण आले. येथील ४० जागांसाठी २०६ जणांच्या मुलाखती झाल्याची माहिती काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी दिली.
गुरुवारी दक्षिण मध्य मुंबईतील १८ जागांसाठी १४० जणांच्या मुलाखती झाल्या. पहिल्या टप्प्यात धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात अणूशक्ती नगर, चेंबूर आणि माहीममधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता यांनी दिली. १७९ क्रमांकाच्या प्रभागावर तब्बल १९ जणांनी दावा ठोकला आहे. (प्रतिनिधी)
> मोठ्या प्रमाणावर हजेरी
घाटकोपर पश्चिमेतील शिवम् हॉलमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉन मुलाखतींना मोठ्या प्रमाणावर काँग्रेसजनांनी हजेरी लावली. मुलुंड पूर्वेला १०८ आणि १०३ क्रमांकांच्या प्रभागासाठीही मुलाखती झाल्या. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा-दहा इच्छुकांनी नेत्यांना मुलाखती दिल्या.

Web Title: 346 interested in Congress for 58 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.