३३४ शाळांची मान्यता धोक्यात
By Admin | Updated: June 30, 2015 03:08 IST2015-06-30T03:08:38+5:302015-06-30T03:08:38+5:30
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित ३३४ प्राथमिक शाळांची मान्यताच धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार नव्याने घ्यावी लागणारी मुदतवाढ

३३४ शाळांची मान्यता धोक्यात
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित ३३४ प्राथमिक शाळांची मान्यताच धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार नव्याने घ्यावी लागणारी मुदतवाढ या शाळांनी घेतलीच नसल्याने संबंधित शाळा अडचणीत सापडल्या आहेत. परिणामी त्याचा फटका शाळेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसह शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
मार्च महिन्यात मान्यता संपल्यानंतर संबंधित शाळांना नव्याने मुदतवाढ घेणे बंधनकारक होते. मात्र त्याकडे केलेला कानाडोळा शाळा प्रशासनांच्या चांगलाच अंगलट येणार आहे. परिणामी मुदतवाढ न घेतलेल्या शाळांतील ११ लाख ९ हजार ७०३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई मनपा शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार ३०५ शाळांना मान्यतेस मुदतवाढ मिळाली नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, दाखल झालेल्या एका अतिरिक्त शपथपत्रात पालिकेच्या ३०५ नव्हे, तर तब्बल ३३४ अनुदानित शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील मान्यतेसाठी मुदतवाढ घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र लिहिले होते. त्यात एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली नसलेल्या शाळांविषयीची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती.
पालिकेने न्यायालयात परवानगी न घेतलेल्या शाळांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे शेकडो शाळा अडचणीत सापडल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
मुदतवाढ न मिळालेल्या अनुदानित शाऴा...
बालमंदिर प्राथमिक मराठी शाळा, गोखले एज्युकेशन सोसायटी, के. एम. शिरोडकर मराठी शाळा, गुरुनानक इंग्रजी प्राथमिक, एसआयडब्लूएस इंग्रजी शाळा, डॉन बॉस्को, बालविकास मंदिर प्राथमिक शाळा, शिवाजी पार्क लॉयन्स, साने गुरुजी विद्यालय, विलेपार्ले महिला संघ, बालविकास विद्या मंदिर, मरोळ प्रागतिक संघ, लॉयन कॉन्व्हेंट स्कूल, कुमुद विद्यामंदिर, अभिनव ज्ञान मंदिर, विद्याभवन प्राथमिक, श्री. एस. के. सोमय्या विद्यालय, केव्हीके घाटकोपर गुजराती, संत ज्ञानेश्वर विद्यालय, शिवाजी विद्यालय, अभिनव विद्यामंदिर, सरस्वती विद्यालय, न्यू हबीब हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी अशा मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांच्या ३३४ शाळांचा यात समावेश आहे.